अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज
By प्रवीण खेते | Updated: September 17, 2022 16:31 IST2022-09-17T16:30:43+5:302022-09-17T16:31:11+5:30
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोल्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस! हवामान विभागाचा अंदाज
अकोला: गत आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागाने वर्तविली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने नदिकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर विभागातर्फे देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात हाेत असलेल्या सततच्या पावसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पाची जलपातळी वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
त्याअनुषंगाने या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी,असे सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.