मुंबईवरून नागपूरच्या दिशेने निघालेल्या ०२१६९ क्रमांकाच्या सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडीमध्ये एका दोन वर्षीय बालकाच्या पोटात अचानक खूप दुखायला लागले. रात्रीच्या वेळी धावत्या गाडीत आता डॉक्टर आणि उपचार कसे मिळणार? या विवंचनेत सापडलेल्या सदर बालकाच्या पालकांनी याची माहिती रेल्वे चाईल्ड लाइनच्या मुंबई कार्यालयात १०९८ या टोलफ्री क्रमांकावर रात्री बाराच्या सुमारास दिली. दरम्यान, मुंबई कार्यालयातून रेल्वे चाईल्ड लाइनच्या अकोला कार्यालयाला याचा संदेश देण्यात आला. संदेश प्राप्त होताच अकोला रेल्वे चाईल्ड लाइनचे समन्वयक पद्माकर सदाशिव यांच्या मार्गदर्शनात रेल्वे चाईल्ड लाइनचे सदस्य अमर इंगळे, भावना डोंगरे यांनी त्वरित अकोल्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल काळपांडे माहिती दिली. त्यावेळी रात्रीचे बारा वाजून गेले होते, परंतु डॉ. काळपांडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत त्यांना बालकाची माहिती विचारीत त्वरित आवश्यक ती औषधी लिहून दिली. त्यानंतर अमर इंगळे आणि भावना डोंगरे यांनी मेडिकलमधून सदर औषधी घेऊन अकोला रेल्वेस्थानक गाठले. रात्री १ वाजून ५ मिनिटांनी सेवाग्राम एक्स्प्रेस अकोला रेल्वेस्थानकावरील दोन क्रमांकाच्या फलाटावर पोहोचताच अकोला रेल्वे चाईल्ड लाइनच्या माध्यमातून सदर बालकाच्या पालकांपर्यंत ही औषधी पोहोचविण्यात आली.
आजारी बालकाच्या मदतीला धावली रेल्वे चाईल्ड लाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST