जीव मुठीत धरून ओलांडतात रेल्वेचा पूल

By Admin | Updated: September 3, 2014 22:41 IST2014-09-03T22:41:20+5:302014-09-03T22:41:57+5:30

शेगाव तालुक्यातील एकफळ आणि कुरखेड या गावात रस्ते नसल्याने नागरिक त्रस्त; विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार.

Railway bridge crossing the fence | जीव मुठीत धरून ओलांडतात रेल्वेचा पूल

जीव मुठीत धरून ओलांडतात रेल्वेचा पूल

फहीम देशमुख / शेगाव
रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी शेगाव तालुक्यातील एकफळ आणि कुरखेडच्या ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून, गावांमध्ये निवडणूक प्रचारावर बंदीही घातली आहे. रस्त्यांअभावी दोन्ही गावाच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असून, शाळेत जायचेच म्हटले तर, त्यांना रेल्वे पूल ओलांडावा लागतो. पूल ओलांडताना एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि एकफळ या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच गावात प्रचारबंदीही घातली आहे. दोन्ही गावाचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांनी त्यांचा हा निर्णय बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांना रितसर कळविला आहे. या पृष्ठभूमिवर या दोन्ही गावाच्या परिस्थितीची पाहणी ह्यलोकमतह्ण चमूने केली. केवळ २५0 लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. अंतर कमी असले तरी, येथील ग्रामस्थांना शेगावात पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतात. ग्रामस्थांना अळसणा मार्गे शेगावला जावे लागते; मात्र अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, काही जमिनींच्या दानपत्रामुळे हे काम अडक ले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रेल्वे पुलाला लागून असलेल्या बिकट रस्त्याने अळसणापर्यंत पायी जावे लागते. पावसाळय़ात या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचते आणि आहे तो रस्ताही बंद होतो. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून जावे लागते.
* येथील नागरिकांना ३00 मिटरचा रेल्वे पुल ओलांडतांना साक्षात देव आठवतो कारण पुलावरुन जात असतांना समोरुन किंवा मागुन रेल्वे गाडी आली तर पुलावरुन खाली उडी मारणे किंवा रेल्वे खाली येणे या शिवाय कुठलाही पर्याय त्यांच्या समोर नसतो.
* दिवसा पुर्वी एका महिलेला प्रसुतीसाठी बैलगाडीत टाकुन शेगावला आणत असतांना संपुर्ण गावकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागली. यापुर्वीही रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यासाठी खांद्यावर बसवुन रुग्णालया पर्यंत न्यावे लागले.
*रस्त्याअभावी शिक्षणाची स्थितीही गंभीर आहे. पाऊस आला की, त्यादिवशी शाळेला दांडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात रुग्णालय नाही, शाळा आहे ती चवथीपर्यंतच, अंतर्गत रस्ते नाहीत आणि नाल्याही नाहीत.

Web Title: Railway bridge crossing the fence