बैदपुऱ्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:29+5:302021-05-08T04:18:29+5:30

जुगार माफिया गुड्डू पठाण फरार अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बैदपुरा येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा ...

Raid on a large gambling den in Baidpur | बैदपुऱ्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

बैदपुऱ्यातील मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड

जुगार माफिया गुड्डू पठाण फरार

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बैदपुरा येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या ठिकाणावरून दोघांना अटक करण्यात आली असून जुगार माफिया गुड्डू पठाण फरार झाला आहे.

काँग्रेस नेता तथा एका नगरसेवकाचा भाऊ असल्याचा फायदा घेत गुड्डू पठाण नामक इसम पोलिसांवर दबाव टाकून सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा येथे खुलेआम जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या विशेष पथकाने बैदपुरा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून विजय खंडारे राहणार अकोट फाइल व शेख अकील शेख शरीफ राहणारा अकोट फाईल या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मात्र गुड्डू पठाण हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तीनही जुगार माफियांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुड्डू पठाण हा राजकीय दबाव वापरून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालवित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोरोनाच्या संकटातही दारूचा महापूर

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या परिसरात दारूची अवैधरित्या विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. हा अवैध धंदाही राजकीय वरदहस्त तून चालविण्यात येत असल्याची माहिती आहे. भाजी बाजारात येणाऱ्या ग्राहकांना त्याचा प्रचंड त्रासही असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी या बड्या माफियांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. या ठिकाणावरून ट्रक चालक, वाहक व हमालांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Raid on a large gambling den in Baidpur