दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:06 IST2018-09-11T18:05:13+5:302018-09-11T18:06:07+5:30
अकोला : खडकी परिसरातील विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला.

दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापेमारी
अकोला : खडकी परिसरातील विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
मंगरुळपीर रोडवरील खडकीतील जिल्हा परिषद कॉलनीला लागून असलेल्या विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यासोबतच रोख रक्कम मोबाइल, दुचाकी व चारचाकी, असा एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलमधून अवैधरीत्या दारू विक्री करणारे नंदकिशोर शांताराम नागे रा. कौलखेड अकोला, दिलीप महादेव वसाहते रा. मोझरी आरमोरी जिल्हा गडचिरोली, विशाल पंजाबराव गुंजाळे रा. जिल्हा परिषद कॉलनी खडकी व राहुल शरद सुरोसे रा. जिल्हा परिषद कॉलनी खडकी या चौघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह केली.