राकॉँ अदलाबदलीस अनुकूल!

By Admin | Updated: August 24, 2014 01:10 IST2014-08-24T01:10:45+5:302014-08-24T01:10:45+5:30

निवडून येणार्‍या उमेदवाराला प्राधान्य; पक्षश्रेष्ठींनी जाणून घेतली जिल्हाध्यक्षांची मते

Racon Adlabs favorable! | राकॉँ अदलाबदलीस अनुकूल!

राकॉँ अदलाबदलीस अनुकूल!

अकोला: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अभेद्य असली तरी राज्यातील काही जागांची अदलाबदल होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून प्राप्त झाले आहेत. अकोला पूर्व व पश्‍चिम मतदारसंघ राकॉंसाठी अनुकूल आहे. त्यापैकी एक मतदारसंघ पक्षाला मिळावा, यासाठीचे सादरीकरण शनिवारी जिल्हा राकाँच्यावतीने शरद पवार यांच्यासमोर करण्यात आले.
एकेकाळी अकोला जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तथापि, गत पंचवीस वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत आहे. यामागे अनेक राजकीय, सामाजिक समीकरणे असली तरी, यापुढे मात्र या जुन्या समीकरणांना छेद देण्याचा काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला आहे. त्यासाठी जेथे पक्षाची व्होट बँक आहे, त्या जागेवर निवडून येणारे सक्षम उमेदवार दिला जाणार आहेत. अकोला जिल्हय़ातील पाचपैकी दोन नवे मतदारसंघ पक्षाच्या यादीत असून, त्यामध्ये अकोला पूर्व किंवा पश्‍चिम यापैकी एक मतदारसंघ सोडण्यात यावा, अशी साद राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून काँग्रेसला घातली जाणार आहे; परंतु अकोला पूर्व हा मतदारसंघ मराठाबहुल असल्याने या मतदारसंघावर राकाँने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मूर्तिजापूर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय राकाँने घेतला आहे.
दरम्यान, शनिवारी शरद पवार यांच्या मुंबईतील ह्यसिल्वर ओकह्ण, या निवासस्थानी राज्यातील राकाँच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. राकाँचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरण व राकाँच्या संभाव्य उमेदवारांबाबत पवार यांच्याशी चर्चा केली. जिल्हय़ात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकदा मिळालेला विजय बघता, सातत्याने आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागत असल्याने नवीन तोडगा काढण्यासंदर्भात विचार करण्यात आला.
२५ ते २७ ऑगस्टपर्यंत निवड मंडळासमोर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींच्या वेळी स्वत: शरद पवार उपस्थित राहून उमेदवारांची केलेले सादरीकरण बघणार आहेत.
दरम्यान, आघाडी निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत असले तरी, जिल्हय़ातील सर्वच विधानसभा मतदारसंघातून पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. यामध्ये आकोट ७, बाळापूर ५,अकोला पूर्व ४,अकोला पश्‍चिम ६ तर सर्वाधिक १७ जणांनी मूर्तिजापूर या मतदारसंघासाठी अर्ज केले आहेत.

Web Title: Racon Adlabs favorable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.