ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:29+5:302021-01-13T04:46:29+5:30
अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा ...

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात
अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
शेतकऱ्यांना या वर्षी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पहिल्यांदा पेरणीच्या वेळी दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैशांची उसनवारी करीत रब्बी हंगामाची तयारी करून पेरणी केली. सध्या शेतात पीक बहरलेले असताना गत दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात सापडले आहे. रब्बी हंगामात उत्पन्न मिळेल, अशी आशा असताना ढगाळ वातावरणामुळे आशा धूसर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
रब्बी हंगामात महत्त्वाचे असणारे हरभरा पीक सध्या जोमात बहरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात हरभऱ्यावर फवारणी करताना शेतकरी दिसत आहे. हरभरा पिकावर आलेल्या या रोगामुळे रब्बी पीकही हातचे जाईल काय, या विवंचनेत शेतकरी आहेत. सद्य:स्थितीत काही भागातच हरभऱ्यावर रोग आला असून, कृषी विभागाने हरभऱ्यावर आलेल्या या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.