वाशिम जिल्हय़ातील राकॉँ नेत्यांचा मुंबईत तळ!
By Admin | Updated: September 7, 2014 22:51 IST2014-09-07T22:51:23+5:302014-09-07T22:51:23+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची मुबंई येथे प्रचारास सुरवात; वाशिम जिल्ह्यातील नेतेमंडळीचा सामावेश.

वाशिम जिल्हय़ातील राकॉँ नेत्यांचा मुंबईत तळ!
वाशिम : काँग्रेसने स्वतंत्ररीत्या प्रचाराचा नारळ फोडताच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रचाराची तुतारी फुंकली असून, शनिवारी झालेल्या मुंबईतील या कार्यक्रमाला जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या झाडून नेत्यांनी हजेरी लावली. यात विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा समावेश असून, उमेदवारीसाठी काहींनी थेट शरद पवार यांच्याकडे वशिला लावल्याचे वृत्त आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत केवळ कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाट्यावर आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसल्याने जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्यांना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील तिन्ही मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे.
दरम्यान, सध्यातरी राष्ट्रवादी कॉग्रेसने कारंजा मतदार संघात निवडणूकीची जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र येथे संभाव्य बंडखोरी पक्षाची डोकेदुखी वाढविणारी आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावरच आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत सर्वच पक्षाचा कस लागणार असल्याने प्रत्येक पक्षाने फुकून पावले टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे कोणीच आपले पत्ते खोलायला तयार नाहीत. त्यामुळे इच्छुकांचे आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. येणार्या दोन दिवसात आघाडीच चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलल्या जात आहे.