बालवाडी-सेमी इंग्लिशच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: May 12, 2014 23:29 IST2014-05-12T22:59:21+5:302014-05-12T23:29:49+5:30
नगरसेवकांनी साधली चुप्पी

बालवाडी-सेमी इंग्लिशच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह
अकोला : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी बालवाडी तसेच सेमी इंग्लिशचा प्रस्ताव मंजूर करणे अत्यावश्यक झाला असताना, प्रशासनासह नगरसेवकांची कचखाऊ भूमिका गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मुळावर उठली आहे. या दोन्ही प्रस्तावांवर निर्णय घेण्यास प्रशासनाकडून होणारी टाळाटाळ तर नगरसेवकांनी साधलेली चुप्पी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करण्यास पुरेशी ठरत आहे.
महापालिकेच्या ५५ शाळांमध्ये मराठी,उर्दू, हिंदी माध्यमाचे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात; परंतु बालवाडी व सेमी इंग्लिश माध्यम लागू नसल्याचा परिणाम मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर होत आहे. यामुळे मागील सात वर्षांमध्ये मनपा शाळेतून सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या संख्येत होणारी घसरण धोक्याची घंटा मानल्या जात आहे. अशी परिस्थिती असतानासुद्धा या मुद्यावर शिक्षण विभागासह गोरगरीब विद्यार्थ्यांचा पुळका आणणार्या नगरसेवकांनी मूग गिळून बसले आहेत. मध्यंतरी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बालवाडीसह सेमी इंग्लिशचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अनिल बिडवे यांना दिले होते. दोन्ही अधिकार्यांनी प्रस्ताव तयार करीत आयुक्तांसमोर ठेवले; परंतु नंतर कोठे माशी शिंकली देव जाणे, या प्रस्तावावर अद्यापही निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या सर्व बाबींचा अनुभव मुख्याध्यापकांसह शिक्षकांना येत आहे. इयत्ता पहिलीसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबवणार्या शिक्षकांना ६ वर्षांपर्यंतची मुलेच सापडत नसल्याची बिकट परिस्थिती आहे. तर गोरगरीब विद्यार्थ्यांचा पुळका आणून शाळेत तोडफोड करणार्या नगरसेवक-नगरसेविकांनीदेखील बालवाडीसह सेमी इंग्लिशच्या मुद्यावर चुप्पी साधल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य संकटात सापडले आहे.
** विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू
मनपा शाळांच्या अवतीभोवती खासगी इंग्रजी शाळांनी विळखा घातला आहे. इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी खासगी शाळेतील शिक्षकांनी मनपा शाळेत गर्दी केल्याचे दिसून येत आहे. शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना विविध आमिष दाखवल्या जात असल्याची माहिती आहे. मनपाच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला असताना, इयत्ता पाचवीची तुकडी नसणे, इयत्ता नववी-दहावीची तुकडी नसल्यामुळे नाइलाजाने विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. यावर नगरसेवकांनीच तातडीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे.