तीन लाख भावी शिक्षकांच्या पात्रतेचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:05 IST2016-01-16T02:05:22+5:302016-01-16T02:05:22+5:30

राज्यभरात एक हजारावर परीक्षा केंद्रे

The question of the eligibility of three lakh future teachers | तीन लाख भावी शिक्षकांच्या पात्रतेचा प्रश्न

तीन लाख भावी शिक्षकांच्या पात्रतेचा प्रश्न

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटीच्या प्रथम व द्वितीय पेपरसाठी राज्यभरात एक हजारावर परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेद्वारे राज्यातील ३ लाख २६ हजार ८२७ भावी शिक्षकांची पात्रता तपासली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दज्रेदार शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्‍चित करण्यात आली आहे. डीटीएड् व बीएड् यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. नोकीच्या उद्देशाने बारावीनंतर कमी वेळेत डीटीएड् (पूर्वीचे डीएड्) पूर्ण करण्याकडे शहरासह ग्रामीण भागातून युवकांचा लोंढा आधी वळला होता. त्यामुळे राज्यभरातील डीटीएड् व बीएड्धारक लाखोंच्या घरात पोहोचले आहेत; परंतु शासनाने शिक्षक भरती बंद केल्याने लाखो डीटीएड् व बीएड्धारक बेरोजगारीच्या गर्तेत ढकलले गेले. या भावी शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय २८ ऑगस्ट २0१३ रोजी घेतला होता. टीईटी घेण्याची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पहिली परीक्षा १५ डिसेंबर २0१३ रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी ५ लाख ९१ हजार ९९0 उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी २९ हजार ६१६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर १४ डिसेंबर २0१४ रोजी ३ लाख ८८ हजार ६६९ उमेदवारांनी टीईटी दिली. यामध्ये केवळ ९ हजार ५३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर आता १६ जानेवारीला टीईटी घेण्यात येत असून, यासाठी राज्यभरातील ३ लाख २६ हजार ८२७ परीक्षार्थींनी नोंदणी केली आहे.
टीईटीच्या प्रथम व द्वितीय पेपरकरिता राज्यभरातील एक हजारावर परीक्षा केंद्रे सज्ज झाली आहेत. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या दोन गटांसाठी शैक्षणिक पात्रता धारण करणार्‍या भावी शिक्षकांना प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे, तर दोन्ही गटांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत.

Web Title: The question of the eligibility of three lakh future teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.