शहरातील पत्रकारांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:35+5:302021-05-07T04:19:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता १८ वर्षांपुढील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या दरम्यान ...

शहरातील पत्रकारांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता १८ वर्षांपुढील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या दरम्यान जीव धोक्यात घालून कोरोना साथीबद्दल वृत्त प्रकाशित करून जनजागृती कारणाऱ्या शहरातील सर्व फ्रंटलाईन वॉरिअर पत्रकारांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर अर्चना मसने यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा सेविका यांच्यासह अनेकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे. अशा सर्वांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून संबोधण्यात आले असून, त्यांना सर्वप्रथम लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश फ्रंटलाईन वर्करना लसीकरणाचा प्रथम व दुसरा डोससुध्दा देण्यात आला आहे. ज्याप्रमाणे फ्रंटलाईन वर्कर यांनी त्यांची भूमिका पार पाडली, त्याचप्रमाणे पत्रकारांनीसुध्दा कोरोना काळात महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे पत्रकारांनाही कोरोना फ्रंटलाईन वर्कर गृहित धरुन त्यांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महापौर अर्चना मसने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा!
जीवघेण्या कोरोनाच्या काळात स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविणाऱ्या शहरातील सर्व पत्रकारांची गैरसोय टाळावी, या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी पत्रकारांना स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही महापौर अर्चना मसने यांनी केली आहे.