राष्ट्रीय युवादिन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST2021-01-23T04:18:35+5:302021-01-23T04:18:35+5:30
अकाेला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ऋषिवर्य श्री घुसरकर महाराज आणि वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगेबाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी - ...

राष्ट्रीय युवादिन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अकाेला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ऋषिवर्य श्री घुसरकर महाराज आणि वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगेबाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी - पुण्यस्मरण सोहळा श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे बुधवारी येथील श्रीराम मंदिरात घेण्यात आला. या सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय युवादिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला लुलेगुरुजी, ग्रामगिता विचार युवा मंचचे प्रा. शुभम वरणकार आणि डॉ. रामजी उपाध्याय या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत अॅड. रामसिंग राजपूत, बाभुळगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डिगांबर ठाकुर आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा फाऊंडेशनचा कार्यकर्ता अनिकेत तायडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जानेवारी १२ रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. या स्पर्धेत पायल काळे प्रथम क्रमांक, अलंकार डंबाळे द्वितीय, तर आदर्श आसरे आणि रुचिका वाघमारे यांना तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
संचालन ग्रामसेवाधिकारी नंदकिशोर डंबाळे यांनी केले, तर संतोष तायडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ग्रामगिता विचार युवा मंच तथा श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दिलीप कराळे, वामनराव मानकर, भाऊराव गावंडे, रामभाऊ राऊत, नारायण इंगळे, प्रभाकर इंगळे, गजानन कोठाळे, केशराराव कोठाळे, दहिभाते महाराज, संतोष ठाकुर यांनी प्रयत्न केले.