कोविडच्या नावावर खासगी रुग्णालयांचा गोरखधंदा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST2021-03-27T04:18:49+5:302021-03-27T04:18:49+5:30
अकोला: कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यास जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र या रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत ...

कोविडच्या नावावर खासगी रुग्णालयांचा गोरखधंदा!
अकोला: कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यास जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र या रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. रुग्णालयात दाखल सर्वच कोविड रुग्णांसाठी मिळून एकदाच वापरलेल्या वस्तूसाठी प्रत्येक रुग्णांकडून स्वतंत्र वसूली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खासगी रुग्णालयांच्या या गोरखधंद्याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. शासकीय रुग्णालयात आवश्यक सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव असल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात, मात्र या ठिकाणी कोविड रुग्णांकडून पैशांची वसूली करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णांची लूट होऊ नये म्हणून प्रशासनाने सर्वसाधारण खोली, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आयसीयू आदिंचे दर निश्चित केले आहे. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून वसूलीचा नवा फंडा शोधून काढला आहे. रुग्णांकडून वसुलण्यात येणारी अतिरिक्त रक्कम ही रुग्णालयांसाठी मोठी नसली, तरी सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ही मोठी रक्कम आहे.
अशी सुरू आहे अतिरिक्त वसूली
शहरातील एका खासगी रुग्णालयात २४ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव असून त्या सर्वच खाटांवर कोविड रुग्णांचा उपचार सुरू आहे. या ठिकाणी रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टर दिवसातून दोन राऊंड घेत असल्यास त्यांच्याकडून दिवसांतून दोन पीपीई कीट आणि मास्कचा वापर होतो. म्हणजेच एका राऊंडमध्ये वापरण्यात आलेली पीपीई कीट २४ रुग्णांच्या तपासणीसाठी वापरली जाते. बाजारात एक पीपीई कीट ही ३०० ते ४०० रुपयांना मिळते. २४ रुग्णांच्या देयकात या किंमतीची विभागणी केल्यास प्रत्येकी केवळ ३३ रुपये दिवसाला येतात, मात्र प्रत्येक रुग्णांच्या देयकात पीपीई कीट व मास्कसाठी दिवसाला एक हजार ते १२०० रुपयांची आकारणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. म्हणजेच केवळ पीपीई कीट आणि मास्कच्या नावाखाली दिवसाला २४ हजार रुपयांची अतिरिक्त वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती लोकमतने केलेल्या पाहणीतून आणि रुग्णांना आकारण्यात आलेल्या देयकातून समोर आली.
रेमडेसीवीरचाही काळाबाजार सुरूच
बाजारात रेमडेसीवीरची एक व्हायल ९०० रुपयांपर्यंतच्या कमी किंमतीत उपलब्ध आहे, मात्र खासगी रुग्णालयांकडून विशिष्ट कंपनीची आणि संलग्नीत औषध दुकानातूनच त्याची खरेदी केली जाते. त्यामुळे रुग्णाला रेमडेसीवीरच्या एका इंजेक्शनसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहे. या काळाबाजारामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात पीळवणूक होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
दर निश्चिती आणि अमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरज
कोविडच्या नावावर खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होत असलेली लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने या प्रकाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. देयकात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दर लावण्याची पद्धती आणि दर निश्चितीसोबतच त्याची अमलबजावणी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.