शिक्षकांना भोवणार प्रचारसभेतील हजेरी
By Admin | Updated: September 19, 2014 00:27 IST2014-09-19T00:27:40+5:302014-09-19T00:27:40+5:30
प्रचारसभेत अथवा रॅलीत शिक्षक सहभागी झालेले दिसले तर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई.

शिक्षकांना भोवणार प्रचारसभेतील हजेरी
बुलडाणा : ग्रामीण भागातील राजकारण स्वत:भोवती वलयांकित करणार्या राजकारणी शिक्षकांना निवडणूक आयोगाने चाप लावला आहे. कुणाच्याही प्रचारसभेत अथवा रॅलीत शिक्षक सहभागी झालेले दिसले तर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काढला आहे. आयोगाचे हे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांसह खासगी शैक्षणिक संस्थांनाही लागू राहणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांशी नाळ जुळलेली असणार्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांकडून संस्था चालक बळजबरीने प्रचार करवून घेतात. निवडणूक आयोगाच्या ही बाब ध्यानात आली. त्यामुळे राजकारण्यांचे हितचिंतक बनलेल्या या शिक्षकांना प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. एखादा शिक्षक एखाद्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत अथवा सभेत दिसून आला तर त्या शिक्षकांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सदर चौकशीत दोष सिद्ध झाल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्याचेही आयोगाने आदेशित केले आहे. निवडणूक आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे दिसून येत आहे.