डॉक्टरअभावी गरोदर महिलेला तीन तास राहावे लागले ताटकळत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST2021-04-18T04:18:38+5:302021-04-18T04:18:38+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका असूनही डॉक्टरअभावी गरोदर महिलेला तीन तास ताटकळत राहावे ...

डॉक्टरअभावी गरोदर महिलेला तीन तास राहावे लागले ताटकळत!
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका असूनही डॉक्टरअभावी गरोदर महिलेला तीन तास ताटकळत राहावे लागल्याचा प्रकार शनिवार, दि.१७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला.
वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठविण्यात येते. मात्र, रुग्णांना १०८ रुग्ण वाहिकेच्या डॉक्टरअभावी तासन्तास ताटकळत राहावे लागते. शनिवारी पातूर येथील २० वर्षीय गरोदर महिला उपचारासाठी प्राथमिक केंद्रात आली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात रुग्णवाहिका होती. मात्र, डॉक्टरअभावी सकाळी ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत महिलेला ताटकाळत बसावे लागले. वेळीच उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाचे काही बरेवाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. गत दहा दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------------------
१०८ रुग्णवाहिकेचा व रुग्णवाहिकेच्या डॉक्टरचा आरोग्य केंद्राशी कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही.
-डॉ. भावना हाडोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी
--------------------------------------------
वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात वेळेवर डॉक्टर हजर राहत नसल्याने रुग्णांना उपचार मिळत नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
-मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव