प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत गरिबांना दोन महिने मिळणार माेफत धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:13+5:302021-05-07T04:19:13+5:30

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत ...

Pradhan Mantri Garib Kalyan Yojana, the poor will get free food for two months! | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत गरिबांना दोन महिने मिळणार माेफत धान्य!

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत गरिबांना दोन महिने मिळणार माेफत धान्य!

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत राज्यातील प्राधान्य गट अंत्योदय योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्य मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाकाळात राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारक लाभार्थींना मोफत धान्याचा दिलासा मिळणार आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कारोनाबाधित रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्यात १४ एप्रिलपासून शासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले. कडक निर्बंधांच्या कालावधीत राज्य शासनामार्फत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मे महिन्यात मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील प्राधान्य गटातील रेशन कार्डधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती पाच किलो आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबांना ३५ किलो मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले. यासोबतच केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना मे व जून या दोन महिन्यांत मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक कुटुंबातील प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने कोरोना काळात राज्यातील गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी रेशन कार्डधारक कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत मोफत धान्यवाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थी रेशन कार्डधारक कुटुंबांना मोफत धान्याचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

बी.यू. काळे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Web Title: Pradhan Mantri Garib Kalyan Yojana, the poor will get free food for two months!