वीज पुरवठा खंडित; ७७ खेड्यांतही जलसंकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:26+5:302021-03-19T04:18:26+5:30
अकोला: वीज देयकाचे ७५ लाख रुपये थकीत असल्याने, जिल्हयातील अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित ...

वीज पुरवठा खंडित; ७७ खेड्यांतही जलसंकट!
अकोला: वीज देयकाचे ७५ लाख रुपये थकीत असल्याने, जिल्हयातील अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई वीज वितरण कंपनीमार्फत गुरुवारी दुपारी करण्यात आली. त्यामुळे या योजनेंतर्गत अकोट व अकोला तालुक्यातील ७७ खेड्यांतही जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि अकोला तालुक्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या फेब्रुवारी अखेरपर्यत वीज देयकांची २ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. थकीत वीज देयकांचा भरणा न केल्यास दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गत ९ मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेदरम्यान दिला होता. थकीत वीज देयकांची रक्कम अदा करण्यात आली नसल्याने खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा १६ मार्च रोजी वीज वितरण कंपनीमार्फत खंडित करण्यात आला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकपोटी १ कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने, योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यानंतर ७५ लाख रुपयांचे वीज देयक थकीत असलेल्या ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा गुरुवार, १८ मार्च रोजी दुपारी वीज वितरण कंपनीमार्फत खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झाल्याने या योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला असून, योजनेंतर्गत अकोट तालुक्यातील ६८ व अकोला तालुक्यातील ९ अशा ७७ खेड्यांतही जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी
अधीक्षक अभियंत्यांना दिले पत्र!
८४ खेडी व ६४ खेडी या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी पाणीपट्टी वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच वीज देयकांच्या थकीत रक्कमेचा भरणा करण्यात येणार आहे. त्यामुळे ८४ खेडी व ६४ खेडी या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवारी सायंकाळी वीज वितरण कंपनीच्या अकोला मंडळ अधीक्षक अभियंत्यांकडे पत्राव्दारे करण्यात आली आहे.
वीज देयकाची रक्कम थकीत असल्याने ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीमार्फत गुरुवारी दुपारी खंडित करण्यात आला. त्यामुळे याेजनेंतर्गत ७७ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
अनिस खान
प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.