अकाेल्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म प्रतिबंध क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:29+5:302021-02-05T06:18:29+5:30

राज्यातील काही भागात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसाच प्रकार जिल्ह्यातही घडत असून, अनेक भागात एकाच ...

Poultry farm at Pimpalgaon Chambhare declared as bird flu outbreak | अकाेल्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म प्रतिबंध क्षेत्र घोषित

अकाेल्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, पिंपळगाव चांभारे येथील पोल्ट्री फार्म प्रतिबंध क्षेत्र घोषित

राज्यातील काही भागात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसाच प्रकार जिल्ह्यातही घडत असून, अनेक भागात एकाच वेळी अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याची शंका उपस्थित झाली हाेती. मध्यंतरी अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील पाेल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून २७८ नमुने संकलित करून तपासणीसाठी पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले हाेते. त्यामध्ये चाचोंडी येथील मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, पिंपळगाव चांभारे, ता. बार्शिटाकळी येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या पोल्ट्री फार्ममधील पक्षांचा अहवाल हा पाॅझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूवर शिक्कामाेर्तब झाले आहे.

काेट

या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या पो‍ल्ट्री फार्मपासून १० किमी त्रिज्येच्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी

बाॅक्स

प्रतिबंधित क्षेत्र घाेषित

मौजे पिंपळगाव चांभारे, ता. बार्शिटाकळी येथील सुरेश बाबाराव सुरडकर यांच्या कुक्कुट क्षेत्रापासून एक कि.मी.चा परिसर हा बाधित क्षेत्र व १० कि.मी. परिसर हा निगराणी क्षेत्र म्‍हणून जाहीर करण्‍यात आला आहे. या बाधित क्षेत्रातील सर्व काेंबड्यांची तसेच निगडित खाद्य व अंडी यांचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत जलद कृती दलास आदेशित केले आहे. यासाठी प्रसार प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी तालुकानिहाय समिती उपविभागीया अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली तयार करण्यात आली आहे. परिसरातील कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करून १० कि.मी. त्रिज्येतील परिसरात कोंबड्यांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रापासून १० कि.मी. त्रिज्येतील परिसर अवागमन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आला आहे.

Web Title: Poultry farm at Pimpalgaon Chambhare declared as bird flu outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.