नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता
By Admin | Updated: June 6, 2014 21:58 IST2014-06-06T21:44:14+5:302014-06-06T21:58:43+5:30
लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगराध्यक्षांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता
आकोट : नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षाचा करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या २६ जून रोजी नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्याने नगराध्यक्षांची निवडणूक होणार असली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्यांकरिता वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने आकोट नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
लोकसभेत भाजप-सेना युतीला विदर्भात चांगले यश मिळाले आहे. दुसरीकडे अनेक नगरपरिषदांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आघाडीच्या कार्यकाळात या नगरपरिषदांनी चांगली विकासकामे केली आहेत तर दुसरीकडे मोदींचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका होईस्तोवर नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिन्याकरिता वाढण्याची शक्यता असून, तशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आकोट नगरपरिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया आहेत. त्यांच्या कार्यकाळात पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासाची कामेसुद्धा झाली आहेत. अशाचप्रकारे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या नगरपरिषदांमध्ये विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे याचा फायदा येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्हावा, याकरिता नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिने वाढविण्यात येणार असून, विधानसभेनंतरच नगराध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.