पंदेकृविचे बीजी-२ कपाशीचे वाण तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 03:35 IST2017-05-28T03:35:18+5:302017-05-28T03:35:18+5:30
बीटी-१ चे संशोधन पूर्ण; यावर्षी घेणार प्रक्षेत्रावर चाचणी.

पंदेकृविचे बीजी-२ कपाशीचे वाण तयार!
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बहुप्रतीक्षित बीजी-२ कापसाचे बियाणे तयार केले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतकर्यांच्या शेतावर या बियाण्यांची चाचणी कृषी विद्यापीठातर्फे घेतली जाणार आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या कपाशी वाणामध्ये बीटी-१ जीन्स ट्रान्सफर करण्यात आला आहे.
खासगी कंपन्यांच्या बीटी कापसाने दीड दशकापूर्वी भारतात प्रवेश केला होता. बघता बघता या बीटीने अख्खी बाजारपेठ काबीज केली. त्यांनतर देशात कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था असताना बीटी कापसाची निर्मिती होत नसल्याची ओरड सर्व स्तरावर झाली. त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने बीटी कापूस संशोधनात लक्ष घातले. कृषी विद्यापीठाचे मागील सात ते आठ वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. आता हे संशोधन पूर्ण झाले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, राज्य शासनाची मान्यता मिळताच चाचणी सुरू केली जाणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकेएच-0८१, एकेएच -८८२८ तसेच पीकेव्ही-रजत या कापसाच्या देशी सरळ वाणामध्ये बीटी-१ जीन्स टाकण्यात आला असून, या वाणाला मंजुरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय पीडीकेव्ही हायब्रीड-२ या बीजी-२ बियाणे निर्मितीसाठी महाराष्ट्र बियाणे महामंडळासोबत कृषी विद्यापीठाने करार केला आहे.
पाठीकेव्ही जेकेएल -११६ म्हणजेच बीजी-२ हे बियाणे मात्र तयार आहे. या बियाण्यांची यावर्षी चाचणी घेऊन पुढच्या वर्षी शेतकर्यांना उपलब्ध केले जाईल.
कृषी विद्यापीठाचे बीजी-२ कपाशीचे बियाणे तयार असून, या बियाण्याला केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. बीटी-१ वरही काम सुरू आहे, तसेच तिसरे वाण बीजी-२ याबाबत महाबीजसोबत करार आहे.
डॉ. दिलीप मानकर,
संचालक संशोधन,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.