संतोष सोनोनेसह दोघे पोलिस कोठडीत
By Admin | Updated: August 29, 2014 01:43 IST2014-08-29T01:32:54+5:302014-08-29T01:43:25+5:30
अकोल्यातील रामटेके हल्ला प्रकरणातील दोन आरोपीना पोलिस कोठडी.

संतोष सोनोनेसह दोघे पोलिस कोठडीत
अकोला - महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामटेके यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी संतोष सोनोने व त्याच्या साथीदारास गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना शनिवार, ३0 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मनपातील गटनेते तथा नगरसेवक अजय रामटेके हे त्यांचे मित्र फजलू पहेलवान यांच्यासोबत मुंबईवरून अकोल्यात आल्यानंतर ऑटोने घराकडे जात असताना त्यांच्यावर दामले चौकामध्ये गोळय़ा झाडल्या, त्यानंतरत्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्यांचा एक हात धडापासून वेगळा केला होता. सदर प्रकरणामध्ये रामटेके यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी संतोष वानखडे ऊर्फ भद्या, गणेश किसन सोनोने, सोनू काशीनाथ जाधव, शेख मोहसीन शेख समद, सोनू रमेश अंबेरे, सागर त्र्यंबक सरोदे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. प्रकरणाच्या तपासात या प्राणघातक हल्लय़ाचा सूत्रधार संतोष सोनोने असल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी रात्री संतोष सोनोने व त्याचा साथीदार धनंजय बिल्लेवार या दोघांना मुंबईतून अटक केली. या दोन्ही आरोपींना बुधवारी मध्यरात्री अकोल्यात आणल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.