मित्राची हत्या करणाऱ्यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 19:19 IST2021-04-04T19:19:01+5:302021-04-04T19:19:28+5:30
Police custody to murder accused : रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मित्राची हत्या करणाऱ्यास पोलीस कोठडी
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथे दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन एकाने दुसऱ्यास लाथाबुक्क्यांनी तसेच मानेवर लाथ मारून हत्या केल्यानंतर जुने शहर पोलिसांनी आरोपीस अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी बाबूलाल शेळके व अमर उर्फ विकी अग्रवाल हे दोघे मित्र असून, शनिवारी रात्री ते दोघे जण सोबत होते. यावेळी अमर व बाबूलाल या दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच अमरने बाबूलाल यांना गमतीमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच अमर अग्रवाल याने बाबूलाल शेळके यांच्या मानेवर जोरात लाथ मारल्याने शेळके यांचा जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर अमर अग्रवाल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी आरोपीस अटक करून रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शहरात शनिवारी रात्री दोन हत्याकांड घडल्यामुळे खळबळ माजली होती. मात्र, जुने शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस अटक केल्यानंतर एका प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याची शहरातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी मोहता मिल रोडवर अशाच प्रकारे दोन मित्रांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याची हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा शनिवारी असाच प्रकार शिवसेना वसाहत परिसरात घडला.