सेतू केंद्रावर शेतकर्यांची लूट
By Admin | Updated: August 6, 2014 01:02 IST2014-08-06T01:02:05+5:302014-08-06T01:02:05+5:30
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या लाभार्थींकडून शासकीय नियमानुसार फी न घेता एका दाखल्याचे ६५ रुपये घेतल्याची

सेतू केंद्रावर शेतकर्यांची लूट
तेल्हारा : उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या लाभार्थींकडून शासकीय नियमानुसार फी न घेता एका दाखल्याचे ६५ रुपये घेतल्याची तक्रार लाभार्थ्याने तहसील कार्यालयात केल्याने तहसीलदारांनी यासंदर्भात तत्काळ दखल घेऊन सेतू केंद्र संचालकांना कार्यालयात बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील प्रवीण प्रल्हाद तायडे व दिवाकर अहेरकर हे ४ ऑगस्ट रोजी शेगाव नाक्याजवळील श्रीकांत जनार्दन बोरसे यांच्या सेतू केंद्रावर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर सेतू केंद्र संचालकाने एका उत्पन्नाच्या दाखल्याचे ६५ रुपये द्या, असे दोघांनाही बजावले. परंतु शासकीय नियमानुसार एवढी रक्कम होत नाही, तुम्हाला ६५ रुपये जर पाहिजे असल्यास त्याची रितसर पावती आम्हाला द्या, असे लाभार्थ्याने म्हटले असता त्यांनी पावती देण्यास नकार देऊन अरेरावीची भाषा वापरली. या प्रकाराची रितसर तक्रार तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे नोंदविली. त्यांनी तत्काळ दखल घेत सेतू केंद्र संचालकाला कार्यालयात बोलावून त्यांची चांगली कानउघाडणी केली. या सेतू केंद्रावर लाभार्थींंकडून शासकीय नियमानुसार रक्कम न घेता अव्वा ते सव्वा रक्कम घेतली जाते. या सेतू केंद्रात रेटबोर्डचा पत्ताच नाही. केलेल्या कामाची पावती मिळत नाही. ज्यांच्या नावावर सेतू केंद्र आहे, तो या ठिकाणी न बसता दुसराच व्यक्ती केंद्र चालवितो. यासाठी लागणार्या कागदपत्रांवर स्वाक्षरीदेखील संबंधित व्यक्तीच करतो. उत्पन्नाच्या दाखल्याचे नियमानुसार ३५ रुपये, सातबाराचे २२.५0 पैसे आणि प्रतिज्ञालेखाचे ३२.५0 पैसे अशी शासकीय दराने रक्कम घ्यावयास पाहिजे असताना संबंधित सेतू केंद्र संचालक मनमानीपणे वसूल करतो. ऑनलाईन पावती कधीही दिल्या जात नाही. शिवाय वरिष्ठांनाही काही जुमानत नाही. त्यामुळे सेतू केंद्राचा एवढा लाड कशासाठी, हा प्रश्न या ठिकाणी वादाचा बनला आहे. लाभार्थींकडून जादा रक्कम वसूल करणार्या सेतू केंद्राचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तक्रारकर्त्यांंनी केली आहे.