सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:31 PM2019-05-17T14:31:59+5:302019-05-17T14:33:03+5:30

अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.

Pleasant Push ... At the foot of Satpura, a fountain of water to dry wells! | सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

Next

- विजय शिंदे
अकोट: प्रखर ऊन व अंगाची लाही लाही होत असताना भूगर्भात खोलवर गेलेली पाण्याची पातळी त्यामुळे ओढावलेला दुष्काळ, अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. अशा स्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलसाठे आढळून येत आहेत. अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत.
अकोट तालुक्यालगत सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. या पर्वतातून बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसांत आलेल्या पाण्यामुळे नदी-नाल्यांना पूर येतो. सातपुड्यातून येणाºया पाण्याचा ओघ पाहता परिसरात पोपटखेडसह इतर धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही होतो. तरीसुद्धा गेल्या काही वर्षांपासून अकोट तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने तालुक्यात टँकर लावण्याची परिस्थिती प्रथमच ओढावली आहे. अशा स्थितीत अचानक सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या काही पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात अचानक वाढ झाली आहे. प्रथमच जितापूर रूपागड परिसरात वन विभागाच्या कार्यक्षेत्रात कूपनलिका करताना मोठ्या प्रमाणात जलसाठा आढळून आला आहे. हा जलसाठा अविरतपणे धो-धो वाहत आहे. विशेष म्हणजे, जितापूर रूपागडच नव्हे, तर पिंप्री खुर्द येथील रामकृष्ण पडोळे यांच्या एदलापूर शेतशिवारात कोरड्या पडलेल्या विहिरीला अचानकपणे पाणी लागले आहे. पडोळे यांच्या शेतातील विहीर कोरडी पडली. त्यामुळे यांनी बोअरवेल केले. बोअरवेलमधूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते. विहीर कोरडी पडल्याने विहिरीत काडीकचरा टाकला जात होता; परंतु अचानक कोरड्या विहिरीतून कबुतरे उडायला लागल्याने पाहिले असता विहिरीत भरपूर पाणीसाठा वर येत असल्याचे आढळून आले. चक्क विहिरीला २० ते २५ फूट पाणी लागले. याशिवाय कासोद येथील गजानन महल्ले यांच्या शेतातील विहीर पाण्याने तुडुंब भरली. शिवाय, संजय तळोकार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीलाही मोठ्या प्रमाणात पाणी लागले व या परिसरातून वाहत असलेल्या नाल्यात जागोजागी नैसर्गिकपणे जलसाठा बाहेर येऊ लागला आहे. अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्याची व्याप्ती वाढत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी गोड्या पाण्याचे साठे आढळत आहेत. त्यामुळे भूगर्भातील एखाद्या पाण्याच्या खाडीला वाट मिळाली की काय, अशी चर्चा आता होत असताना नैसर्गिक जलसाठे हे संशोधनाचा विषय झाला आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत आढळून येत असलेले हे जलसाठे पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच हौशी नागरिक कुटुंबासह या स्थळी जाऊन सहलीचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.
 

 

Web Title: Pleasant Push ... At the foot of Satpura, a fountain of water to dry wells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.