हिवरखेड येथील शेतरस्त्याची दैना
By Admin | Updated: July 20, 2014 01:42 IST2014-07-20T01:37:42+5:302014-07-20T01:42:48+5:30
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील रस्त्यांची दुरवस्था.

हिवरखेड येथील शेतरस्त्याची दैना
हिवरखेड : येथील मुंजावाट गोर्धा या शेतरस्त्याची पार दैना झाली आहे. या रस्त्यावरून बैलबंडीसारखे वाहन जाणेही अशक्य असल्यामुळे शेतात विविध साहित्य नेताना शेतकर्यांना मोठी अडचण होत आहे.
हिवरखेड येथील शेतशिवाराकडे जाण्यासाठी मुंजवाट गोर्धा हा ३ ते ४ किलोमीटर अंतराचा कच्चा रस्ता आहे. गावातील बहुतांश शेतकर्यांची शेती या रस्त्यावरच येत असल्याने या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असतो. गत काही दिवसांपूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु थोड्याच दिवसांनी हे काम बंद पडले. रस्त्याचे काम बंद पडल्याचे कारणही कोणाला कळू शकले नाही. त्यामुळे हा रस्ता जैसे थे असून, पावसाळय़ात थोडाही पाऊस पडल्यानंतर रस्ता पूर्ण चिखलमय होतो. त्यामुळे रस्त्यावरून बैलबंडीही जाऊ शकत नाही आणि माणसाला पायीसुद्धा चालता येत नाही. अशा परिस्थितीत विविध कामासाठी लागणारे साहित्य शेतामध्ये न्यावे तरी, कसे हा प्रश्न शेतकर्यांसमोर उपस्थित होतो. अनेक शेतकरी, तर नाईलाजास्तव बियाणे, खते आदी साहित्य नेण्यासाठी चक्क गाढवांचा वापर करीत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांच्या समस्या लक्षात घेऊन रस्ता मजबूत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी येथील शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.