प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी कर्दनकाळ

By Admin | Updated: June 5, 2014 01:41 IST2014-06-05T01:41:03+5:302014-06-05T01:41:14+5:30

अकोला शहरात होतो दररोज १0 लाख प्लास्टिक पिशव्यांचा वापर.

Plastic Bags Environment | प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी कर्दनकाळ

प्लास्टिक पिशव्या पर्यावरणासाठी कर्दनकाळ

डॉ. किरण वाघमारे / अकोला

शहरातील कुठल्याही दुकानात जा, तुम्हाला हातात पिशवी घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्हाला पाहिजे त्या वस्तू घ्या, या वस्तू नेण्यासाठी तुम्हाला हमखास प्लास्टिक पिशवी मिळणारच. भाजीपासून तर औषधीपर्यंत आणि किराण्यापासून तर कपड्यापर्यंत सर्वच वस्तूंचे वहन प्लास्टिकच्या पिशव्यांमधूनच होत आहे. शहरात १८ हजार १७0 विविध वस्तू विकणारे दुकाने आहेत. प्रत्येक दुकानातून साधारणपणे दररोज ५0 पिशव्या ग्राहकांमार्फत रस्त्यावर फेकल्या जातात. दररोज साधारणपणे १0 लाख प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाला हानी पोहोचवित आहेत. या प्लास्टिक पिशव्या शहरवासीयांसाठी कदर्नकाळ बनत चालल्या आहेत. पर्यावरणाला घातक ठरणार्‍या या पिशव्यांबाबत महापालिका फारसे गंभीर नसल्यामुळे या पिशव्या शहरवासीयांसाठी समस्या बनल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा मोठय़ा प्रमाणात वापर वाढला आहे. या पिशव्यांमधून वस्तू नेणे आता फॅशन होऊ पाहत आहे; परंतु या पिशव्या आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत, याचा विचार ना विक्रेते करतात ना ग्राहक करतात. अकोला शहरात १८ हजार १७0 दुकाने आहेत. नुसता भाजी विक्रेत्यांचा जरी विचार केला तर मुख्य भाजीबाजारात जवळपास २00 भाजी विक्रेते आहेत. एक भाजी विक्रेता दररोज साधारपणे ५0 प्लास्टिक पिशव्या उपयोगात आणतो. म्हणजेच मुख्य भाजीबाजारात भाजी विक्रेतेच दररोज १ हजार पिशव्या ग्राहकांच्या माध्यमातून उपयोगात आणतात. पुढे ही प्लास्टिक पिशवी घराच्या आजूबाजूला कुठेतरी पडलेली असते. असाच प्रकार शहरातील इतर भागात भाजीसह इतर गोष्टींची विक्री करणार्‍या विक्रेत्यांकडून होत असतो. अकोला शहरात नियमांना पायदळी तुडवून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. शहरात ज्या प्लॉस्टिक पिशव्या वापरात आणल्या जातात त्यांच्यावर कुठल्याही कंपनीचे नाव नाही. नियमांकडे डोळेझाक करून या पिशव्या अकोला शहरातच तयार केल्या जातात. या पिशव्या सर्व्हिस लाईनमध्ये नाल्यांमध्ये टाकल्या जातात. यामुळे नाल्या चोकअप होऊन सांडपाणी साचून राहते आणि यातच डासांची उत्पत्ती होऊन आजारासाठी कारणीभूत ठरत आहेत. प्लास्टिक साधारणपणे ४00 वर्ष नष्ट होत नाही. त्यामुळे हे प्लास्टिक दीर्घकाळ पर्यावरणाला हानी पोहोचवित राहते. यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Web Title: Plastic Bags Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.