अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणारा गजाआड
By Admin | Updated: May 24, 2017 01:36 IST2017-05-24T01:36:52+5:302017-05-24T01:36:52+5:30
अकोला: अकोट फैल परिसरात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या एका विवाहित इसमास अकोट फैल पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणारा गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट फैल परिसरात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या एका विवाहित इसमास अकोट फैल पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अकोट फैलमधील रहिवासी असलेली १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी नायगाव आणि अकोट फैल येथे कचरा वेचण्याचे काम करण्यासाठी दररोज जात होती. या ठिकाणी कचरा वेचताना तिची ओळख याच परिसरातील रहिवासी शेख नासीर शेख कालू (२०) याच्याशी झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर गत एक वर्षापासून ते दोघे एकमेकांना न चुकता भेटत होते. दरम्यान, तीन दिवसाआधी शेख नासीरची पत्नी मुलासह माहेरी गेली असता घरी कुणीही नसल्याची संधी साधत शेख नासीरने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन तिचे शारीरिक शोषण केले. हा प्रकार सतत सुरू असतानाच त्याची पत्नी अचानक घरी परतली असता तिला तिच्या पतीचे अल्पवयीन मुलीसोबत असलेले शारीरिक संबंध दिसले. हा प्रकार दोघांच्या कुटुंबीयांना माहिती झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला व शेख नासीर या दोघांनाही मारहाण करण्यात आली. घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला मारहाण प्रकरणाची तक्रार दिली असता पोलिसांनी मुलीला मारहाण करण्याचे कारण विचारले; मात्र कारण देण्यास आई-वडील असमर्थ ठरल्याने पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यामुळे घडलेला लैंगिक शोषणाचा प्रकार अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितला. यावरून पोलिसांनी शेख नासीर याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.