शेंगा पोखरणा-या किडींचा तुरीवर हल्ला!
By Admin | Updated: November 17, 2014 01:30 IST2014-11-17T01:30:55+5:302014-11-17T01:30:55+5:30
अनेक ठिकाणी तूर फुलो-यावरच.

शेंगा पोखरणा-या किडींचा तुरीवर हल्ला!
अकोला : तूर राज्यातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे; परंतु या पिकाच्या उत्पादनात घट येणार्या कारणापैकी तुरीवर होणारा किडीचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. डाळवर्गीय पिकावर पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळपास दोनशे प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असून, सद्यस्थितीत फुलोर्यावर असलेल्या तूर या पिकावर शेंगा पोखरणार्या अळ्य़ांनी हल्ला केला आहे. शेंगा पोखरणार्या अळ्य़ापासून तूर पिकाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, या किडीमुळे पिकांचे सर्वसाधारण ३0 ते ७0 टक्कय़ापर्यंत नुकसान होत असल्याने शेतकर्यांना या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. या किडीला हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटेअळी या नावाने ओळखले जाते. ही कीड बहुभक्षीय असून, तूर, हरभरा, वटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी इत्यादी कडधान्यावर फार मोठय़ाप्रमाणात आढळून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, टमाटे, तंबाखू, गांजा, सूर्यफूल, करडई य पिकावरदेखील ही कीड आढळून येते. या किडीचे पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो, पंखाची लांबी सुमारे ३७ मि.मी.एवढी असते. त्यांच्या पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. या किडीची मादी कोवळी पाने, देठ अथवा कळ्य़ा, फुले, तसेच शेंगावर वेगवेगळी अंडी घालतात, एक मादी सरासरी ६00 ते ८00 अंडी घालते, मादी नरापेक्षा मोठी असून, तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका असतो. तुरीवर शेंगा पोखरणार्या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, या किडीमुळे मोठे नुकसान होत असल्याने शेतकर्यांनी या किडीचे कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार एकात्मिक व्यवस्थापन करण्याची गरज आहे. मोठय़ा प्रमाणात कीड आल्यास कीटकनाशकांची फवारणी करण्याची शिफारस कृषी विद्यापीठाने शेतकर्यांना केली आहे.