वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:11 IST2018-12-14T13:10:58+5:302018-12-14T13:11:09+5:30
अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल
- सदानंद सिरसाट
अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विभागीय कार्यालयांना दिले आहेत.
राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला सातत्याने बगल दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील पारंपरिक वीटभट्ट्यांसाठी (स्थान, निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या वीटभट्ट्या कोणत्या ठिकाणी असू नयेत, याबाबत विविध ठिकाणे, रस्ते, गावांपासूनचे अंतरही निश्चित केले आहे. या नियमांचा भंग करणाºया वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत; मात्र कारवाईस टाळाटाळ करण्यात आली. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या मुद्यांवर कारवाई करावी, याबाबत पर्यावरण विभागाच्या सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत नियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्या सुधारित नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र २ नोव्हेंबर २०१८ रोजीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयांना देण्यात आले.
हवेचे प्रदूषण रोखण्याचा उपाय
हवेची गुणवत्ता खराब होत असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातून सजीवांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. तो रोखण्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार वीटभट्टी लावण्याचा नियमही ठरवून देण्यात आला.
वीटभट्टीच्या धुरामुळे पर्यावरणाचा घात
वीटभट्टीमध्ये ९:४:६ इंच आकाराचे २५ हजार तसेच ९:४:३ इंच आकाराचे ५० हजार नगांची एकाचवेळी निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांत पुन्हा वीटभट्टी लावायची असल्यास सक्षम अधिकाºयांनी परवानगी दिल्यानंतरच लावता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन होत असल्याची खात्री अधिकाºयांना करावी लागणार आहे.
निर्मितीच्या आकड्यासाठी पुन्हा तपासणी
जिल्ह्यातील अनेक वीटभट्ट्यांवर नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात; मात्र त्यातून किती विटांची निर्मिती केली जात आहे, यासाठी पुन्हा तपासणीची तयारी होण्याची शक्यता आहे.