१७ टक्के कमिशन घेऊन अदा केली एक काेटींची देयके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:43+5:302021-02-06T04:31:43+5:30
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून शहरातील जलकुंभ व जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. याकरिता झाेननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

१७ टक्के कमिशन घेऊन अदा केली एक काेटींची देयके
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून शहरातील जलकुंभ व जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. याकरिता झाेननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्तीची कामे केल्यानंतरही जलप्रदाय विभागाकडून देयक अदा केले जात नसल्यामुळे मध्यंतरी संबंधित कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला हाेता. अर्थात कंत्राटदारांचे देयक अदा करणे मनपा प्रशासनाची नैतिक जबाबदारी असली तरी ही देयके पदाधिकारी किंवा प्रभावी नगरसेवकांच्या इशाऱ्यानुसारच अदा करण्याची पद्धत महापालिकेत रूढ झाली आहे. देयक हवे असेल तर मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या वशिल्यानंतरच प्रशासन कामाला लागते, असा आजवरचा अनुभव आहे. या प्रक्रियेत कंत्राटदारांची आर्थिक पिवळणूक करणे हाच मुख्य उद्देश असल्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांसह काही अधिकाऱ्यांचेही चांगलेच फावते. गुरुवारीदेखील जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांची अशाच पद्धतीने आर्थिक पिवळणूक करून एक काेटी आठ लाख रुपयांची देयके अदा करण्यात आली.
१६ जणांना प्रत्येकी साडेआठ लाख अदा
जलकुंभ, जलवाहिनीची दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांना आठ-आठ महिने देयक अदा केले जात नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागताे. त्याची जाणीव न ठेवता पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार सुमारे १६ कंत्राटदारांना प्रत्येकी साडेआठ लाख रुपयांनुसार एक काेटी आठ लाख अदा करण्यात आले. त्याबदल्यात कंत्राटदारांचे आर्थिक शाेषण केले.
विद्युत देयकापाेटी २८ लाख अदा
रेल्वे प्रशासनाकडून मनपाला पाणीपट्टीच्या माेबदल्यात ९५ लाख रुपये प्राप्त झाले हाेते. या रकमेतून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठ्यासाठी प्राप्त २८ लाख रुपयांचे देयक प्रशासनाने अदा केले. उर्वरित रक्कम कंत्राटदारांना अदा केली.