पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:43 AM2019-11-27T10:43:05+5:302019-11-27T10:43:17+5:30

तांत्रिक सबबीच्या नावाखाली वाढीव दराने निविदा सादर कंपन्यांवर सत्ताधारी भाजपकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या सदस्यांनी केला.

Over Spending on the work of water supply scheme by rulling BJP in Akola | पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण

पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘अमृत’योजने अंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक स्काडा आटोमेशन मशीनची खरेदी करणे तसेच महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पीएसी पावडरचा पुरवठा करण्यासाठी कंपन्यांनी सादर केलेल्या वाढीव दराच्या निविदांना महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शिवसेना तसेच भारिप-बमसंने कडाडून विरोध दर्शविला. तांत्रिक सबबीच्या नावाखाली वाढीव दराने निविदा सादर कंपन्यांवर सत्ताधारी भाजपकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या सदस्यांनी केला.
केंद्र शासनाच्या ‘अमृत’योजने अंतर्गत ‘भूमिगत गटार’योजनेसह संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.
सदर योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असून, महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचा केला जाणारा उपसा आणि शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पोहचविण्याच्या कामासाठी अत्याधुनिक स्काडा आॅटोमेशन मशीनची खरेदी करण्यासाठी मनपा प्रशासनाने निविदा प्रकाशित केली होती. तब्बल तिसऱ्या वेळी निविदा प्रकाशित केली असता, एसएपी कंन्ट्रोल सिस्टीम अ‍ॅन्ड इंजिनिअर्स प्रा.लि. नागपूर यांनी चक्क १२ टक्के वाढीव दराची निविदा प्राप्त झाली.
वाढीव दर कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने कंपनीसोबत चर्चा केली असता, कंपनीने केवळ ०.५० टक्के दर कमी करत साडेअकरा टक्के दर कायम ठेवले, हे येथे उल्लेखनीय. याव्यतिरिक्त महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पीएसी पावडरचा पुरवठा करण्यासाठी मनपाकडे मे. पार्श्व असोसिएट्स नागपूर, कंपनीची तब्बल २७.३ टक्के वाढीव दराची निविदा प्राप्त झाली. याकरिता मनपाने ३० लक्ष ५९ रुपये किंमत निश्चित केली होती. या दोन्ही वाढीव दराच्या निविदेला मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंजुरी देण्याचा विषय पटलावर आला असता, शिवसेना सदस्य गजानन चव्हाण, मंगेश काळे, भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी कडाकडून विरोध केला. मनपातील सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात वाढीव दराच्या निविदांना नियमात बसवून मंजुरी दिली जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी केला. ‘स्काडा आटोमेशन’च्या खरेदी प्रकरणी घाई न करता आधी कार्यशाळा घेऊन माहिती द्या, तोपर्यंत विषय स्थगित ठेवण्याची मागणी सेना व भारिपच्या सदस्यांनी केली असता, ती स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी फेटाळून लावत या दोन्ही निविदांना मंजुरी दिली.


८ कोटीतून ‘स्काडा’मशीन खरेदी!
पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ कंपनीकडून शहरात नवीन आठ जलकुंभ उभारणीसह संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलण्याचे काम होत आहे. ‘स्काडा’ मशीनच्या माध्यमातून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचा उपसा करणे आणि जलकुंभांपर्यंत निर्धारित वेळेत पोहचविण्याचे काम केल्या जाणार आहे. या कामासाठी मनपाने ७ कोटी ७६ लक्ष ६४ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. कंपनीने सादर केलेले दर लक्षात घेता ही किंमत ८ कोटी ६५ लक्ष ९५ हजार ३४६ रुपये होणार आहे.


मूल्यांकित किमतीचा खटाटोप कशासाठी?
मजीप्राचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी)यांच्या पत्रानुसार सदर मशीन खरेदीची मूल्यांकित किंमत ८ कोटी १८ लक्ष ४२ हजार निश्चित करण्यात आली होती. साडेअकरा टक्के वाढीव दरानुसार कंपनीने सादर केलेल्या ८ कोटी ६५ लक्ष ९५ हजार रुपयांची तुलना केली असता, ही निविदा ५.८० टक्के दराने जास्त दिसत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या ठिकाणी प्रशासन कंपनीला साडेअकरा टक्के दरानुसार देयक अदा करणार असल्याने हा मूल्यांकित किमतीचा कागदोपत्री खटाटोप कशासाठी, असा सवाल उपस्थित होऊन प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.


शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
स्थायी समिती सभागृहात शिवसेना-भारिपचे सदस्य आक्रमक असल्याचे दिसून आले. तांत्रिक सबब पुढे करून वाढीव दराच्या निविदांना मंजुरी देणाºया सत्तापक्षासह प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने शासनाकडे तक्रार करण्याचे संकेत दिले आहेत.

Web Title: Over Spending on the work of water supply scheme by rulling BJP in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.