सेंद्रिय शेती अभ्यासक्रम अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 01:27 IST2016-01-22T01:27:11+5:302016-01-22T01:27:11+5:30

अभ्यासक्रम केवळ अकोल्यात; निधी नाही, विद्यापीठापुढे अभ्यासक्रम चालवण्याचे आव्हान.

Organic farming course is in trouble! | सेंद्रिय शेती अभ्यासक्रम अडचणीत!

सेंद्रिय शेती अभ्यासक्रम अडचणीत!

राजरत्न सिरसाट/अकोला: प्रत्येकाला पोषक अन्न मिळावे, ते अन्न विषमुक्त असावे, यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात असले तरी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यात आघाडी घेतली आहे. विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय असल्याने या विद्यापीठाने देशातील पहिला सेंद्रिय शेती अभ्यासक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ७0 च्यावर विद्यार्थ्यानी येथून सेंद्रिय शेती अभ्यासक्रम पूर्ण केला असून, यंदा १५ विद्यार्थी या अभ्यासक्रमाला आहेत; पण शासकीय निधीच नसल्याने हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचे आव्हान या विद्यापीठापुढे निर्माण झाले आहे.
सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होताच अधिक वाढला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २0१0 साली सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत.
कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भारत सरकारच्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूरच्या वतीने विदर्भातील शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे आयोजनदेखील करण्यात येत असते.सेंद्रिय पदार्थांना उपलब्ध असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा
विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती काय आहे, याचा अभ्यास व्हावा, याकरीता अभ्यासदौरे काढण्यात येत असून, कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती अभ्यासक्रमाचे सात विद्यार्थी गुरुवारी कर्नाटक धारवाड येथील सेंद्रिय शेती संस्थेत गेले आहेत.

निधी, अनुदान नाही
या कृषी विद्यापीठात शिकवल्या जाणार्‍या सेंद्रिय शेती अभ्यासक्रमाला कोणताच निधी अथवा अनुदान नसल्याने कृषी विद्यापीठासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी शासनाने निधीची तजवीज करण्याची खरी गरज आहे.

Web Title: Organic farming course is in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.