ऑपरेशन मुस्कानमुळे ३९ बालकांना आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:07 IST2019-12-20T18:07:01+5:302019-12-20T18:07:08+5:30
या मोहीमेंतर्गत १ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील हरविलेले ३२ मुले व १६ मुलींना शोधण्यात मुस्कान पथकाला यश आले आहे.

ऑपरेशन मुस्कानमुळे ३९ बालकांना आश्रय
अकोला : हरविलेल्या अल्पवयीन मुलांना शोधण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान २०१९’ ही मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या मोहीमेंतर्गत १ ते १९ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील हरविलेले ३२ मुले व १६ मुलींना शोधण्यात मुस्कान पथकाला यश आले आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या या बालकांना बाल निरीक्षण गृह आणि बालिकाश्रमामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना हक्काचा आश्रय मिळाला आहे.
जिल्हाभरात हरविलेली अल्पवयीन मुले, भीक मागणारी, कचरा गोळा करणारी, मंदीर, रुग्णालय परिसरात आढळून येणारी अल्पवयीन मुले शोधण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्यावतीने राज्यभरात आॅपरेश मुस्कान राबविण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गायत्री बालिकाश्रम तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येत आहे. या मोहिमेला १ डिसेंबरपासून या सुरुवात झाली आहे. अवघ्या १९ दिवसांत ३९ बालके शोधण्यात या पथकाला यश आले आहे.
असे आहे पथक
हरविलेल्या मुलांना शोधण्याकरिता ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील आठ पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी दोन कर्मचारी सहभागी होऊन हरविलेल्या आणि भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा शोध घेत आहेत.
संपर्क करा
जिल्ह्यात हरविलेले, रस्त्यावर, मंदिर परिसरात किंवा रुग्णालय परिसरात कुठेही अल्पवयीन मुले आढळल्यास पोलीस विभागाच्या ०७२४-२४४५३०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.