विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा मुहूर्तच मिळेना!
By Admin | Updated: June 12, 2017 19:42 IST2017-06-12T19:42:41+5:302017-06-12T19:42:41+5:30
चोहोट्टा बाजार येथील प्रकार : ३५ लाख रुपयांचा खर्च करून उभारले विश्रामगृह

विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा मुहूर्तच मिळेना!
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार : चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर ३५ लाख रुपये खर्च करून विश्रामगृहाची भव्य इमारत उभारण्यात आली. परंतु, या विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने, नवीन इमारत दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे.
चोहोट्टा बाजार येथील दुय्यम कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील विश्रामगृहाची जुनी इमारत ही पूर्णत: क्षतिग्रस्त झाली होती. ती पडल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. याबाबत ह्यलोकमतह्णमधून वारंवार वृत्त प्रकाशित करून नवीन विश्रामगृह बांधण्यात यावा, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. याबाबीची जिल्हा परिषदेतील तत्कालीन सदस्य रमेश म्हैसने यांनी दखल घेत जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून चोहोट्टा बाजार येथे नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी शेष फंडातून ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या मागणीला जि.प.तील एकाही पदाधिकाऱ्याने कधीही विरोध केला नाही, हे विशेष. ह्यलोकमतह्णचा पाठपुरावा आणि रमेश म्हैसने यांच्या प्रयत्नाने नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे; परंतु या इमारतीच्या उद्घाटनासाठी जि.प. प्रशासनाला वेळ सापडत नसल्याने आज ही इमारत निरुपयोगी ठरली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन विश्रामगृहाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त काढावा, अशी मागणी होत आहे.
शंकरराव पाटलांचा मोठेपणा..
विश्रामगृह बंधकामासाठी आपल्या मालकीची लाखो रुपयांची जागा प्रशासनाला दान देऊन येथील शेतकरी नेते शंकरराव पाटील बुंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांच्या या मोठेपणाबद्दल आजही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शंकरराव पाटलांनी दान दिलेली जागा व्यर्थ जाऊ नये, यासाठी मी जि.प.मध्ये सातत्याने पाठपुरावा केला आणि नवीन विश्रामगृह बांधण्यासाठी ३५ लाख रुपये मंजूर करून घेतले.
- रमेश म्हैसने, तत्कालीन सदस्य, जि.प. अकोला.
कर्मचाऱ्यांअभावी उद्घाटन रखडले आहे. या विश्रामगृहाचे लवकरच उद्घाटन व्हावे, यासाठी प्रयत्न करू.
- संध्याताई वाघोडे, अध्यक्ष जि.प. अकोला.