दिवसभरात एकाचा बळी; १३ नवे पॉझिटिव्ह, ३२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 19:23 IST2020-08-02T19:23:05+5:302020-08-02T19:23:21+5:30
रविवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६७९ झाली आहे.

दिवसभरात एकाचा बळी; १३ नवे पॉझिटिव्ह, ३२ कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या विषाणूने गत चार महिन्यांपासून कहर केला आहे. रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे. तर रविवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६७९ झाली आहे. दरम्यान, ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सहा महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. सकाळी सिंधी कॅम्प-शास्त्री नगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १२ जणांमध्ये खांबोरा येथील चार जण, कापसी येथील तीन जण, जीएमसी हॉस्टेल, सिंधी कॅम्प, बोंदरखेड, पीकेव्ही व जूना शहर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
८१ वर्षीय वृद्ध दगावला
कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच असून, रविवारी जुने शहरातील बाळापूर रोड भागातील ८१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
३२ जणांना डिस्चार्ज
रविारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२, कोविड केअर सेंटर अकोला येथून १२, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, तर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४२३ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६७९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २१४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.