ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांसमोर अडथळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:50 AM2020-06-07T10:50:53+5:302020-06-07T10:50:58+5:30

ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला; मात्र या पर्यायाचा वापर करताना, विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Obstacles in front of students while learning online! | ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांसमोर अडथळे!

ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांसमोर अडथळे!

googlenewsNext

- नितीन गव्हाळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यतील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. परीक्षा रद्द करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने, त्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला; मात्र या पर्यायाचा वापर करताना, विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत दीक्षा अ‍ॅपसह व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले; परंतु विद्यार्थी, पालकांकडे भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात येऊन शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग सुरू होतील, अशी अपेक्षा होती; परंतु सुरू न झाल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला.विविध शैक्षणिक लिंकद्वारे, विविध अ‍ॅप, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्याचे शहरी भागासह ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी अनुकरण केले. पालकांना सुट्या असल्यामुळे त्यांचे स्मार्टफोन विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले; परंतु दररोजच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण द्यावयाचे झाल्यास त्यात अनेक अडचणी आहेत. काही शाळांनी व्हर्च्युअल, ऑनलाइन क्लास रूम सुरू केल्या आहेत.


शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. आहे तर त्यात इंटरनेट सुरू करण्यासाठी पैसे नाहीत. स्मार्टफोन असेल तर नेटवर्कची समस्या आहे.
-तुलसीदास खिरोडकर, तंत्रस्नेही शिक्षक

शहरी भागात ऑनलाइन शिक्षण घेताना अडचणी नाहीत; परंतु ग्रामीण भागात भौतिक सुविधा नसल्यामुळे आॅनलाइन शिक्षण देताना, शिक्षकांना अडचणी येत आहेत. यातून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न आहे; परंतु शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. टीव्ही, रेडियाच्या माध्यमातूनसुद्धा शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे.
-डॉ. समाधान डुकरे, प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था


ग्रामीण भागात ३५ टक्के पालकांकडेच स्मार्टफोन
६५ टक्के मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यातही शहरी भागातील पालकांची टक्केवारी अधिक आहे. ग्रामीण भागात मात्र ३५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यातही इंटरनेट, नेटवर्कची समस्या आहे.

 

Web Title: Obstacles in front of students while learning online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.