कामधेनू दत्तकग्राम योजनेतील गावाची संख्या घटली
By Admin | Updated: January 22, 2016 01:23 IST2016-01-22T01:23:04+5:302016-01-22T01:23:04+5:30
कामधेनू दत्तकग्राम योजनेत राज्यातील २४0२ गावांचा समावेश; ९४९ गावे कमी.

कामधेनू दत्तकग्राम योजनेतील गावाची संख्या घटली
नीलेश शहाकार/बुलडाणा : जनावरांचे आरोग्य सुदृढ व्हावे, दुधाचे उत्पादन वाढावे, पशुपालकांची संख्या वाढून दर्जेदार उत्पादनासाठी दूध व पूरक उत्पादने वाढावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामधेनू ग्राम दत्तक योजना राबवण्यात येते. चालू वर्षात राज्यातील २४0२ गावांसाठी ही योजना राबविली जात असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९४९ गावे कमी झाली आहे.
शेतकर्यांच्या जनावरांचे आरोग्य सदृढ करणे व दुध उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कामधेनू ग्राम दत्तक योजना राबविण्यात येते. यातून जनावरांमध्ये वांझपणावर उपाययोजना, गोचीड प्रतिबंध व निर्मूलन, जंतनिर्मूलन, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, पशुपालक प्रबोधनात्मक सहल, सकस चारा निर्मिती, हायड्रोफोनिक किंवा अझोला चार्याची निर्मिती करणे, दूध उत्पादन वाढविणे, मूरघास प्रकल्प आदी उपक्रम राबविले जातात. ३00 पेक्षा जास्त पैदास सक्षम जनावरे असलेल्या गावांची अथवा दोन किंवा तीन गावे मिळून ३00 पेक्षा जास्त पैदास सक्षम जनावरे असल्यास त्या गावांची निवड केली जाते. २0१४-१५ मध्ये कामधेनू दत्तक योजनेसाठी ३३५१ गावाचा समावेश होता. २0१५-१६ मध्ये गावाच्या संख्येत घट झाली. यावर्षी २४0२ गावात ही योजना राबवण्यात येत असून, गतवर्षीच्या तुलनेत ९४९ गावे कमी करण्यात आली आहेत.
पशुपालक मंडळ स्थापना रखडली
पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यामाने बुलडाणा जिल्ह्यात ९५ गावांमध्ये कामधेनू ग्राम दत्तक योजना राबविली जात आहे. योजनेत सहभागी गावामध्ये ग्रामसमिती स्थापन करुन ग्रामसभेतून पशुपालक मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही बर्याच गावांमध्ये पशुपालक मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया रखडल्यामुळे बरेच लाभार्थ्यांवर योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.