...त्यामुळे आता रक्तदानावेळी द्यावं लागणार ‘आधार’ किंवा पॅन कार्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:26 PM2019-08-30T13:26:00+5:302019-08-30T13:26:08+5:30

यापुढे रक्तदान करायचे असल्यास रक्तदात्यांना ‘आधार कार्ड’ सोबत ठेवावे लागणार आहे.

Now 'Aadhar' card mandatory for blood donation! | ...त्यामुळे आता रक्तदानावेळी द्यावं लागणार ‘आधार’ किंवा पॅन कार्ड!

...त्यामुळे आता रक्तदानावेळी द्यावं लागणार ‘आधार’ किंवा पॅन कार्ड!

googlenewsNext

- प्रवीण खेते 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जात असून, हजारो रक्तदाते नियमित रक्तदान करतात; परंतु अनेकदा या माध्यमातून एचआयव्हीसारखे आजार पसरण्याची शक्यता दाट असते. यावर अंकुश लावण्यासाठी तसेच एचआयव्हीसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या रक्तदात्यावर वेळीच उपचार व्हावा, या अनुषंगाने रक्तदानावेळीच रक्तदात्यांकडून ‘आधार कार्ड’ घेतले जाणार आहे. यासंदर्भात राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणतर्फे राज्यभरातील सर्वच रक्तपेढ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे रक्तदान करायचे असल्यास रक्तदात्यांना ‘आधार कार्ड’ सोबत ठेवावे लागणार आहे.
राज्यात रक्तदात्यांची लक्षणीय संख्या आहे. यातील बहुतांश रक्तदाते नियमित रक्तदान करतात, तर काही आपत्कालीन परिस्थितीतच रक्तदान करणारे आहेत. या रक्तदात्यांकडून संकलित रक्ताची वैद्यकीय तपासणी रक्तपेढ्यांमार्फत केली जाते. तपासणीमध्ये काहींना एचआयव्ही असल्याचे निदान होते अन् रक्तपेढ्या ते रक्त नष्ट करतात; परंतु निदान झालेल्या रक्तदात्यांपर्यंत ही माहिती पोहोचविल्या जात नाही. शिवाय, बहुतांश रक्तपेढ्यांकडून ही माहिती ‘इंटेग्रेटेड कौन्सिलींग अ‍ॅण्ड टेस्टींग सेंटरकडे (आयसीटीसी) पाठविली जात नाही. त्यामुळे संबंधित रक्तदात्यांपर्यंत वेळीच योग्य उपचार पोहोचत नाही. एचआयव्ही असल्याची माहिती नसल्याने इतर माध्यमातून त्याच्याद्वारे इतरांना एचआयव्हीचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर नियंत्रणासाठी राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणातर्फे राज्यभरातील सर्वच रक्तपेढ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, यापुढे रक्तदात्याला रक्तदान करण्यापूर्वीच आधार कार्ड द्यावे लागणार आहे.

‘आधार’ला ‘पॅन’कार्डचा पर्याय
ज्या रक्तदात्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही, अशा रक्तदात्यांना पर्याय म्हणून पॅन कार्ड देता येणार असल्याचे राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे रक्तदात्यांना रक्तदानावेळी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे.


राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणचा हा निर्णय चांगला असून, त्या माध्यमातून एचआयव्हीच्या संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होईल. यासाठी रक्तदात्यांना प्रोत्साहित करणार आहोत.
- डॉ. महेंद्र तामणे, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला.

रक्तदात्याला एचआयव्ही असल्याची माहिती असल्यावरही राज्यात बहुतांश ठिकाणी त्या रक्तदात्यांचे समुपदेशन केले जात नव्हते; परंतु राज्य रक्त संक्रमण प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे प्रत्येक रक्तदात्याची संपूर्ण माहिती रक्तपेढ्यांकडे उपलब्ध असणार आहे. परिणामी, अशा रक्तदात्यांना योग्यवेळी समुपदेशन करण्यास मदत होईल. अकोल्यात असा रक्तदाता आढळल्यास त्याची माहिती संकलित करून त्याला योग्यवेळी समुपदेशन करण्याची प्रक्रिया गत वर्षभरापासूनच सुरू आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

Web Title: Now 'Aadhar' card mandatory for blood donation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.