आत्महत्या नसून भावानेच केला खून!
By Admin | Updated: June 10, 2016 01:55 IST2016-06-10T01:55:30+5:302016-06-10T01:55:30+5:30
तीन महिन्यांनंतर आरोपी गजाआड; पैशाच्या व्यवहारातून घडली घटना

आत्महत्या नसून भावानेच केला खून!
अमडापूर (बुलडाणा): तीन महिन्यांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अमडापूर येथील बबलू ऊर्फ विनोद सदाशिव महापुरे याची आत्महत्या नसून त्याचा खून झाल्याचे अमडापूर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्याचा खून करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून सख्खा चुलत भाऊ राहुल देवीदास महापुरे हा असून पैशाच्या वादातून त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीने चुलत भावाचा काटा काढला. मागील ३१ मार्च रोजी येथील बबलू ऊर्फ विनोद सदाशिव महापुरे याचे बाजार समितीच्या नजीकच्या झाडाला प्रेत आढळून आले होते. अमडापूर पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता; मात्र मृतकाची पत्नी सीमा विनोद महापुरे हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. या तक्रारीवरून अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी मोठय़ा शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला.