‘किट’च नाही; चार तालुक्यांत सिकलसेलची तपासणी शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:23 IST2019-06-16T14:23:15+5:302019-06-16T14:23:28+5:30
अकोला : ‘किट’ उपलब्ध नसल्याने चार तालुक्यांत आतापर्यंत सिकलसेलची एकही तपासणी झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

‘किट’च नाही; चार तालुक्यांत सिकलसेलची तपासणी शून्य
- प्रवीण खेते
अकोला : सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे; मात्र ‘किट’ उपलब्ध नसल्याने चार तालुक्यांत आतापर्यंत सिकलसेलची एकही तपासणी झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
सिकलसेल आजारावर नियंत्रणासाठी गत आठ वर्षांपासून जिल्ह्यात आरोग्य विभाग लढा देत आहे. मोहिमेंतर्गत २०११ पासून आतापर्यंत १ ते ३० वर्षे वयोगटातील ६ लाख ८४ हजार ८८३ महिला व पुरुषांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आहे. यंदाही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिकलसेल तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत केवळ तीन हजार महिला व पुरुषांचीच तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी अकोला, मूर्तिजापूर आणि अकोट या तीन तालुक्यांत सुरू असून, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर या चार तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ‘किट’च उपलब्ध नसल्याने सिकलसेलच्या तपासणीला सुरुवातच झाली नाही. ही मोहीम जागतिक सिकलसेल दिवस म्हणजेच १९ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे; मात्र अद्याप जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये तपासणीच झाली नसल्याचे वास्तव आहे.
संबंधितांची कानउघाडणी
सिकलसेल तपासणी किट उपलब्ध नसल्याची माहिती पुरविण्यात न आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी शनिवारी संबंधितांची कानउघाडणी केली. शिवाय, पर्यायी व्यवस्था लावून मोहीम यशस्वी राबविण्याबाबत सूचना दिली.
ही आहेत उद्दिष्टे
- सिकलसेल आजाराचे जनतेतील प्रमाण शोधून काढणे
- लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती व्हावी
- लग्नापूर्वी प्रत्येक स्त्री, पुरुषाने सिकलसेलची चाचणी करावी
- सिकलसेल रुग्ण आणि वाहक यांच्यातील विवाह टाळणे आणि अपत्यांना या आजारापासून वाचविणे
मोहीम यशस्वी राबविण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिली आहे. शिवाय, किट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.