नुसतं टिव्हीवर झळकणं, म्हणजे करिअर नव्हे!

By Admin | Updated: November 23, 2014 23:41 IST2014-11-23T23:41:37+5:302014-11-23T23:41:37+5:30

लोकमत मुलाखत; नवोदित गायकांना उत्तरा केळकर यांचा सल्ला.

Not to be seen on TV, that is not a career! | नुसतं टिव्हीवर झळकणं, म्हणजे करिअर नव्हे!

नुसतं टिव्हीवर झळकणं, म्हणजे करिअर नव्हे!

राम देशपांडे/अकोला
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा म्हणत उत्तरोत्तर कीर्तीचा कळस उंच अंबरात नेणार्‍या लोकप्रिय पार्श्‍वगायिका उत्तरा केळकर या एका कार्यक्रमानिमित्त रविवार, २३ नोव्हेंबर रोजी अकोल्यात आल्या. सत्यम् शिवम् सुंदरा. ते बिलनशी नागीन निघाली. यासारख्या गीतांनी रसिकांना मोहिनी घालणार्‍या उत्तरा केळकर यांनी ३५ वर्षांच्या प्रवासाबद्दल ह्यलोकमतह्णशी दिलखुलास गप्पा मारल्या. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या नवोदित कलाकारांना, केवळ नुसतं टिव्हीवर झळकणं म्हणजे करिअर नव्हे, असा मोलाचा सल्ला देत, त्यांनी देशाला लाभलेल्या परंपरागत संगीताचा वारसा पुढे कायम ठेवण्याचे आवाहन केले.

प्रश्न : संगीत क्षेत्रात आपले पदार्पण कसे झाले?
उत्तर : माझी आई वामनराव सडोलीकरांची शिष्या होती. स्वत: एक गायिका असल्याने तिने माझ्यातले गुण ओळखले. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ती मला प्रोत्साहित करायची. मी उत्तम गायन आत्मसात करावं, ही तिची इच्छा होती. शालेय जीवनात मला आईनेच गायनाचे धडे दिले. महाविद्यालयीन जीवनापासून पुढे २७ वर्ष सातत्याने पंडित फिरोझ दस्तूर यांच्याकडे मी शास्त्रोक्त पद्धतीने संगीताचे धडे घेतले. विल्सन कॉलेजमधून बीए, तर मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताच्या परीक्षा उत्तीर्ण झाली.

प्रश्न : पार्श्‍वगायनाकडे कशा काय वळल्या?
उत्तर : २0 व्या वर्षी लग्न झालं. यजमानांनादेखील गायनाची आवड असल्याने मला लग्नानंतरही प्रोत्साहन मिळालं. त्यांची खूप इच्छा होती की, मी पार्श्‍वगायन क्षेत्राकडे वळावं. क्लासिकलसह संगीत क्षेत्रातील विविध प्रकार शिकण्यासाठी मी पंडित यशवंत देव आणि श्रीकांत ठाकरे यांच्याकडे सुगम संगीताचे धडे घेतले. आवाजातील लकब, हावभाव, शब्दांचे स्पष्ट उच्चार या सर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगचा अनुभव घेत असताना मला सोलो गायनाची सवय झाली. समोर आलेलं गाणं कशा पद्धतीने गावं याचा अभ्यास झाल्याने मला गाण्याच्या अनेक लहान-लहान संधी मिळत गेल्या. दररोज तासन्तास रियाज करायची, त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये पार्श्‍वगायक म्हणून संधी मिळत गेली.

प्रश्न : चित्रपट सृष्टीत कसे पदार्पण झाले?
उत्तर : १९७६ मध्ये श्याम बेनेगल यांच्या भूमिका या हिंदी चित्रपटातील एका गीतात लहानसा भाग गाण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर ओ.पी. नय्यर यांच्या खून का बदला खून या चित्रपटात मी गायले. त्यानंतर या गीतांमधील आवाज कुणाचा याचा शोध घेत संगीतकार राम कदम माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सर्वप्रथम त्यांच्या सुशीला या चित्रपटात नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा. हे गीत गाण्याची संधी दिली. त्याकाळी अतिशय लोकप्रिय झालेल्या या गीतानंतर मला राम कदमांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमधून गाण्याची संधी दिली. त्यानंतर विश्‍वनाथ मोरे, बाबूजी (सुधीर फडके) यांच्यासोबत मला गायनाची संधी मिळाली. हळुहळू अनेक जणांनी मी गायलेल्या गाण्यांची दखल घेण्यास सुरुवात केली. १९७९ मध्ये वसंतराव जोगळेकर यांच्या बहिणाबाईंच्या साहित्यावर आधारित चित्रपटातील १६ ही गाणे गाण्याचं भाग्य मला लाभलं. त्यानंतर मी केवळ सोज्वळ गाणी न गाता इतर प्रकारची गाणीदेखील गावीत, यासाठी राम कदम व विश्‍वनाथ मोरे यांनी धडे दिले. त्यांनी मला ठसकेबाज लावणीतल्या लकबी शिकविल्या. अनेक चित्रपटांमधून लावणी हा प्रकार गात असतानाच लोकसंगीतातील गावरान ठसक्याचा अनुभव करून देणारी ह्यबिलनशी नागीन निघालीह्ण ही लावणी अजरामर झाली. श्रीधर फडके, नंदू होनप, आनंद मोडक, अशोक पत्की यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांकडे मी गाऊ लागले. ओ.पी. नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी, राम-लक्ष्मण, आनंद-मिलिंद यांच्यासारख्या प्रतिभावान संगीतकारांची गाणी मी हिंदी चित्रपटांमध्ये गायली.

प्रश्न : आणखी कोण-कोणत्या भाषेत आपण गायलात?
उत्तर : मराठी व हिंदीसह मी तेलगू, बंगाली, गुजराथी, गढवाली, भोजपुरी, हरियाणवी, उरिया, मारवाडी अशा जवळपास बारा-पंधरा भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून मी गाणी गायली. आशा भोसले, उषा खाडीलकर यांच्यासारख्या प्रतिभावान गायिकांसोबतही गाण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्यच समजते.

प्रश्न : कोण-कोणते पुरस्कार मिळाले आहेत?
उत्तर : दोन मराठी चित्रपटांसाठी मला दोनवेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय दर्पण पुरस्कार, तानसेन पुरस्कार मला मिळालेत.

प्रश्न : गाण्याव्यतिरिक्त इतर काही काही छंद?
उत्तर : यजमानांच्या निधनानंतर मुलीचं लग्न झालं. गाण्याची आवड जोपासत मी मुंबईतच दादरला नवोदित कलाकारांना संगीताचे धडे देते. त्यासाठी मी संगीत क्लासदेखील सुरू केला आहे.

प्रश्न : नवोदित गायकांना काय सांगाल?
उत्तर : नुसतं टिव्हीवर झळकणं म्हणजे करिअर नाही. तरुण, नवोदित गायक कलाकारांनी याची जाणीव ठेवण्याची खरी गरज आहे. थोडीशी प्रसिद्धी मिळाली, तरी पाय जमिनीवरच ठेवावेत. आपल्या गाण्यांमुळेच आपल्याला खरी ओळख मिळते. त्यासाठी रियाजदेखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेक जुन्या गायक कलाकारांप्रमाणे बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, अजय-अतुल अशी बरीच यशस्वी ठरलेली उदाहरणे आज आपल्यासमोर आहेत. नवोदित कलाकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा.

Web Title: Not to be seen on TV, that is not a career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.