पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 10:14 IST2020-08-22T10:13:57+5:302020-08-22T10:14:07+5:30
पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

पश्चिम वऱ्हाडासाठी उपकेंद्र नको; स्वतंत्र विद्यापीठ हवे!
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करता येईल का, यासाठी सात सदस्यांचा अभ्यासगट उच्च व तंत्रशिक्षण विभाग स्थापन करणार असल्याचे या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. या पृष्ठभूमीवर पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आता चालना देण्याची गरज शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अमरावती विद्यापीठाची स्थापना १९८३मध्ये करण्यात आली. या विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले असून पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र या विद्यापीठाचे आहे.
या विद्यापीठांतर्गत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांचे अंतर लक्षात घेता विद्यापीठाच्या निर्मितीपासून पश्चिम वºहाडासाठी उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी होती. सन १९९५ ला तत्कालीन सिनेट सदस्यांनी सिनेटमध्ये वाशिमसंदर्भात तसा ठरावही पारित करून घेतला होता. सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुलडाण्यात उपकेंद्र सुरू करण्याची ग्वाहीही दिली होती; मात्र पश्चिम वऱ्हाडाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षच होत गेले.
आता उपकेंद्राची उपयुक्तताही संपली असून, पश्चिम वºहाडातील शैक्षणिक व्याप्ती लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठाचीच गरज निर्माण झाली आहे.
मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच!
अमरावती विद्यापीठावरील शैक्षणिक ताण लक्षात घेता १९९७ पासून उपकेंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता; मात्र ही मागणी दुर्लक्षितच राहिली. या दरम्यान पुणे, मुंबई, नांदेड, जळगाव या विद्यापीठांचे उपकेंद्र अस्तित्वात आले व आता उस्मानाबादचे केंद्र हे विद्यापीठ होण्याकडे वाटचाल करत आहे. यापासून धडा घेत आता पश्चिम वऱ्हाडासाठी स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याची गरज आहे.
तर मराठवाड्यात तिसरे विद्यापीठ
उस्मानाबादचे विद्यापीठ अस्तित्वात आले तर आठ जिल्ह्यांच्या मराठवाड्यातील हे तिसरे विद्यापीठ ठरेल. दुसरीकडे विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी तीन विद्यापीठ कार्यरत असले तरी त्यामधील अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ करण्याची जुनी मागणी आहे. त्यामुळे उस्मानाबादसाठी ज्या प्रमाणे अभ्यासगट स्थापन केला आहे, त्याच धर्तीवर पश्चिम वºहाडासाठीही चाचपणी व्हावी.
पश्चिम वऱ्हाडालाही लागतो अंतराचा निकष
औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी उस्मानाबाद उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मग हाच निकष पश्चिम वºहाडासाठीही लागू होतो. बुलडाण्यातील सिंदखेडराजा, वाशिममधील केनवड असो की अकोल्यातील पातूर, बाळापूर तालुक्यातील दुर्गम गावे असोत, या गावांमधील विद्यार्थ्यांना अमरावतीत पोहोचणे त्रासदायकच आहे.
अमरावती विद्यापीठाचे विभाजन ही मागणी जुनीच आहे. उस्मानाबादच्या निमित्ताने या मागणीला मूर्तरूप येण्याची गरज आहे. महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता लहान विद्यापीठ हे अधिक दर्जेदार ठरू शकते. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे.
-डॉ. संजय खडक्कार
विद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठ
पश्चिम वऱ्हाडासाठी अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करणे आता फारसे उपयुक्त नाही. त्यामुळे स्वतंत्र विद्यापीठच या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस महत्त्वाचे ठरेल. या बाबत मी स्वत: मागणी केलेलीच आहे. त्याचा आणखी पाठपुरावा या निमित्ताने करता येईल.
-डॉ. नीलेश गावंडे
व्यवस्थापन समिती सदस्य
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ