तुम्ही व्हा मोठे कितीही, आई, आईच राही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:04+5:302021-02-05T06:14:04+5:30

पारस : ‘आईची माया, जग तिच्या पाया...ना दुसरे दैवत काही...तुम्ही व्हा मोठे कितीही, आई, आईच राही...’ असे एका कवीने ...

No matter how big you are, mother, stay mother ... | तुम्ही व्हा मोठे कितीही, आई, आईच राही...

तुम्ही व्हा मोठे कितीही, आई, आईच राही...

पारस : ‘आईची माया, जग तिच्या पाया...ना दुसरे दैवत काही...तुम्ही व्हा मोठे कितीही, आई, आईच राही...’ असे एका कवीने म्हटले आहे. ते उगाचच नाही. आईची माया जगावेगळी आहे. तिचे उपकार थोर आहेत. तिचे ऋण कधीच फिटत नाही. अशाच एका आईविषयी तिच्या नागपूरला सीआरपीएफ दलात पोलीस निरीक्षक असलेल्या मुलाने कृतज्ञता व्यक्त करीत, तिच्यावरील प्रेमापोटी आईचा गावात हृद्य सत्कार घडवून आणला. आईच्या सत्काराने अख्खे मनारखेडवासी भारावून गेले. एवढेच नाहीतर सासूबाईचा आईप्रमाणे सांभाळ करणाऱ्या गावातील पाच सुनांना आई सेवा पुरस्कार देऊन समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला.

बाळापूर तालुक्यातील मनारखेड गावातील भावलाल इंदोरे हे नागपूरला सीआरपीएफमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. आईवडीलांनी त्यांना मोठे करण्यासाठी कष्ट केले. हालअपेष्टा सहन केल्या. शिक्षण दिले. त्यांचे उपकार थोर म्हणूनच, आपण मोठ्या पदावर कार्यरत आहोत. या भावनेतूनच भावलाल इंदोरे यांनी, आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निश्चय केला. आई ही पहिली गुरू असते आणि आईची सेवा करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. परंतु बदलत्या काळात आईकडे बघायला, तिची विचारपूस करायलाही, कुणालाही वेळ नाही. जीवनात कितीही मोठे झाले, पैसा, धन, दौलत सर्वकाही मिळाले. परंतु आपण जन्मदात्या आईलाच विचारत नसू तर ते ऐश्वर्य शून्य आहे. आई आहे तर सर्वकाही आहे, असा संदेश देण्यासाठीच भावलाल काशिराम इंदोरे यांनी आई शांताबाई इंदाेरे यांचा सत्कार करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुलाचे तिच्याप्रती असलेले प्रेम पाहून, आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. आईचा सत्कार सोहळा पाहून मनारखेडवासीसुद्धा भारावून गेले.

फोटो

प्रेरणा मिळावी यासाठी आई सेवा पुरस्कार!

प्रत्येकाने आपल्या आईची सेवा केली पाहिजे. आईची सेवा करण्याची मुलगा, त्याच्या पत्नीला प्रेरणा मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून भावलाल इंदोरे यांनी २६ जानेवारीपासून गावामध्ये अभिनव उपक्रम सुरू केला. तो म्हणजे आई सेवा पुरस्कार. गावातील सासूबाईची आईस्वरूप सेवा करणाऱ्या पाच सुनांची त्यांनी निवड करून त्यांना आई सेवा पुरस्कारासह साडी, चोळी भेट दिली. यंदा आई सेवा पुरस्कार गावातील रत्ना शंकर भामद्रे, सुमित्रा रामहरी डाबेराव, वर्षा गणेश सुरोशे, सुशीला संतोष लोड, रुख्माबाई देवलाल इंदोरे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला सविता भावलाल इंदोरे, प्रेरणा भावलाल इंदोरे, सरपंच डॉ. सुरज पाटील, उपसरपंच वैशाली गोपाल दिवनाले, सदस्य उज्ज्वला राजेश लोड, लताबाई दिनकर सुरोशे, प्रमिला शरद दिवनाले, मेजर डी.के. सुरोशे, शिवशंकर लोड, विनोद मेसरे, अंबादास नागे, गजानन सुरोशे, सैन्य दलात कार्यरत जय गजानन भिंगे, सचिव सुधीर काळे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन वरुडकर, मुख्याध्यापक सलामे उपस्थित होते.

Web Title: No matter how big you are, mother, stay mother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.