मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 01:37 PM2019-10-16T13:37:26+5:302019-10-16T13:37:31+5:30

आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

No automobiles recorded in the automotive department! | मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या मोटर वाहन विभागाचा कारभार रसातळाला गेला असून, त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घंटागाड्या बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही घंटागाड्या बेवारस स्थितीत असताना संबंधित जबाबदार वाहन चालकाला जाब विचारण्याची हिंमत विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना नसल्यामुळे की काय, या विभागाचे ‘तीन-तेरा’ वाजल्याचे केविलवाणे चित्र आहे. या गंभीर प्रकरणाची महापालिका आयुक्त संजय कापडणीस दखल घेतील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरात दररोज २२० टनपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. २०१५ पूर्वी घरातून निघणारा कचरा सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर टाकणे किंवा घरासमोर रस्त्यालगत फेकून दिल्या जात असल्याचे चित्र होते. मुख्य बाजारपेठेतही हीच स्थिती होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीग साचल्याची परिस्थिती होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रत्येक घरातून, बाजारपेठेतून कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ४५ वाहनांची खरेदी केली. मनपाची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे मानधन किंवा कंत्राटी तत्त्वावर वाहन चालकांची नियुक्ती करण्यापेक्षा घंटागाडीवर ‘स्वयंसेवकां’ची नियुक्ती करण्याचे धोरण पत्करले. घरातून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना ३० रुपये आणि दुकाने, कमर्शियल कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, महाविद्यालय व बाजारपेठमधून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.
जमा केलेले शुल्क वाहन चालकाला मानधन म्हणून देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असताना आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
दुपारी २ वाजतापर्यंत कचरा जमा करून तो नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकल्यानंतर घंटागाड्या मोटर वाहन विभागात जमा करणे अपेक्षित नव्हे बंधनकारक आहे. तसे होत नसल्यामुळे काही वाहने बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.


इंधनात घोळ; रात्री ११ वाजता सेवा कशी?
मनपाच्यावतीने प्रत्येक घंटा गाडीमध्ये त्या प्रभागाचे आणि नायगावातील डम्पिंग ग्राउंडचे अंतर लक्षात घेता किमान ६ ते ७ लीटर इंधन भरल्या जाते. दुसरीकडे रात्री ११ वाजता हॉटेलमधील अन्नपदार्थ चक्क राष्ट्रीय महामार्गालगत टाकण्यासाठी घंटा गाड्यांचा वापर होत असल्याचे दिसून येते. काही घंटा गाडी चालक भाजी बाजारातील सडका भाजीपाला व खानावळी, हॉटेलमधील शिळे अन्न जमा करून वराह पालन करणाºया व्यावसायिकांना विक्री करीत असल्याची माहिती आहे. हा सर्व खेळ रात्री चालत असताना मोटरवाहन विभागाने जाणीवपूर्वक डोळ््यांवर पट्टी बांधल्याचे चित्र दिसून येते.


वाहनांची दररोज नोंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. सायंकाळी किंवा रात्री कचरा जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत. घंटा गाडीचा खासगी कामासाठी वापर होणे ही गंभीर बाब असून, यासंदर्भात विभाग प्रमुखांना जाब विचारला जाईल. दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा

 

Web Title: No automobiles recorded in the automotive department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.