दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाइल नंबर पाठ नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:46+5:302021-07-10T04:13:46+5:30
मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकाॅल मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो, असे ...

दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाइल नंबर पाठ नाही!
मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकाॅल मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो, असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला; परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाइल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकाॅल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.
लोकमत @गांधी चौक
अ - एकाला वडिलांचा क्रमांक आठवला; परंतु बायकोचा क्रमांक नाही आठवला.
ब - एकाला स्वतःच्या क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच क्रमांक पाठ नव्हते.
क - एकाला दुकानातील नोकरांचे क्रमांक पाठ होते; मात्र घरातील सदस्यांचे क्रमांक पाठ नव्हते.
ड - आणखी एकाला स्वतःच्या क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच क्रमांक पाठ नव्हते.
ई - एकाला आई-वडिलांचा क्रमांक आठवला; परंतु बायकोचा क्रमांक आठवला नाही.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे सारखेच!
शहरातील परिसरांमध्ये लोकांना विचारणा केली असता अनेकांना एकमेकांचे वाढदिवस, मोबाइल क्रमांक अशा गोष्टी पाठ नसल्याचे दिसून आले.
वाढदिवसाची तारीख ही सोशल मीडियाद्वारे कळत असल्याचे अनेकांनी सांगितले, तर मोबाइल क्रमांकाविषयी विचारणा केली असता तरुणवर्ग हा पूर्णपणे मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून आले.
अनेक तरुणांना आपल्या आई-वडिलांच्या मोबाइल क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच मोबाइल क्रमांक पाठ नसल्याचे आढळून आले, तर वृद्ध नागरिकांना पूर्वीप्रमाणे डायरी सांभाळून ठेवण्याची सवय असल्याने त्यांनी काही महत्त्वाचे क्रमांक डायरीमध्ये लिहून ठेवले असल्याचे सांगितले.
बायकांनाही पतिदेवाचा नंबर आठवेना!
मला केवळ पतीचा मोबाइल क्रमांक पाठ आहे तर मुलाच्या मोबाइलचे सुरुवातीचे चार आकडे पाठ आहेत. पुढील आठवत नाहीत. स्वत:चा पाठ आहे.
- एक गृहिणी
मोबाइलमध्ये सर्व काही सेव्ह होत असल्याने आता क्रमांक पाठ करून ठेवण्याचा काळ गेला आहे. त्यामुळे स्वतःचा मोबाइल क्रमांक सोडता इतर कोणाचेच क्रमांक पाठ नाहीत.
- एक गृहिणी
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
प्रत्येक पालकाने आपला मुलगा कुठे विसरला तर त्याला घरी परत येता यावे म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला. यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर मूकपाठ आहे. त्यामुळे तो मोबाइल न घेता नंबर सांगू शकतो.
- विहान
मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाइल नंबर पाठ आहे. हातात मोबाइल न घेता मला तो नंबर सांगता येतो. यामुळे कधी नंबर हरविला तर मला विचारले जाते आणि मी सहज नंबर सांगतो.
- नूतन
मोबाइलच्या अतिवापरामुळे लहान मुलांसोबतच तरुणांमध्येही पेशन्सची कमी झाली आहे. त्यांना सर्वकाही एका क्लिकवर मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविण्याची गरज आहे.
- डॉ. शिल्पा तायडे, मानसोपचार तज्ज्ञ, जीएमसी, अकोला