अपारंपरिक पिकांचा अवलंब काळाची गरज - प्रदीप इंगोले
By Admin | Updated: February 23, 2015 01:54 IST2015-02-23T01:54:38+5:302015-02-23T01:54:38+5:30
कृषी विद्यापीठात तीळ, भुईमूग लागवडीवर पीक परिसंवाद.

अपारंपरिक पिकांचा अवलंब काळाची गरज - प्रदीप इंगोले
अकोला: बदलत्या ऋतूचक्राच्या प्रभावाने शेती व्यवसायात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून, शेतकरी संभ्रमात असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सध्यातरी शेतकर्यांनी अपारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्यांकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकर्यांनी उन्हाळी तीळ आणि भुईमुगासारखे मध्यम कालावधीचे पीक घेणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी शनिवारी केले.
डॉ.पंदेकृवि आणि इफकोच्यावतीने शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात उन्हाळी तीळ व भुईमूग पीक परिसंवाद पार पडला. या परिसंवादाचे उद्घाटन डॉ. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाशिम जिल्हय़ातील प्रगतिशील शेतकरी दिलीप फुके, इफकोचे विपणन व्यवस्थापक कोटेचा, कृषी विद्यापीठाचे डॉ. नितीन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिसंवादात अपारंपरिक पिके घेण्यावर उपस्थिती तज्ज्ञांनी भर दिला. भुईमूग व तीळ ही पिके मध्यम कालावधीचे आणि अधिक पैसा मिळवून देणारे असल्याने हे पीक शेतकर्यांना फायदेशीर असल्याचा सूर यांच्या मार्गदर्शनातून उमटला. तेलबिया संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ मनीष लाडोळे, माने, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पी.पी. चव्हाण यांनी या पिकाचे महत्त्व या परिसंवादातून शेतकर्यांना पटवून दिले. फुके व यादवराव ढवळे या प्रगतिशील शेतकर्यांनी अनुभव कथन व चित्रफितीद्वारे अपारंपरिक पीक पद्धतीचे फायदे विशद केले.