रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाची गरज!
By Admin | Updated: November 17, 2014 01:29 IST2014-11-17T01:29:35+5:302014-11-17T01:29:35+5:30
एकात्मिक किड व्यवस्थापनाची गरज; कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक.

रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाची गरज!
अकोला: रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीपासूनच काळजी घेण्याची गरज असून, किडीचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास उत्पादनात भर पडत असल्याने शेतकर्यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओलिताखालील गव्हाची पेरणीसाठी एच.डी.-२१८९, एकेडब्ल्यू १0७१, एच.डी.२३८0, एमएसीएस-२४९६ या वाणांच्या लागवडीची शिफारस केलेली आहे. गहू पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. हरभरा पिकांची पेरणी मागील आठवड्यापर्यंत तर काही शेतकर्यांनी रविवार, १६ नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली आहे. या पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्यांनी बीज प्रक्रिया ही महत्त्वाची उपाययोजना पेरणीसमयी करण्याची गरज आहे. हरभरा या पिकावर सुरुवातीपासूनच घाटेअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकर्यांनी या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ही कीड हरभर्याचे प्रचंड नुकसान करीत असते. त्यासाठी सुरुवातीला एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज असून, या किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने शेतकर्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकर्यांनी कोबी, फुलकोबीच्या रोपाची पुनर्लागवड करावी, तसेच मुळा, गाजराच्या बियाण्यांची पेरणी करावी, इतर पालेभाज्यांची टप्याटप्याने पेरणी करणे गरजेचे आहे. या शिवाय रब्बी कांदा पेरणीसाठी रोपवाटिका तयार केली असेलच, नसेल तर रोपवाटिका तयार करावी, या काळात गुलाबाची हलकी छाटणी करणे आवश्यक आहे. निशिगंधा व गिलार्डिया या फुलांच्या काढणीचा वेळ असल्याने या फुलांची काढणी करावी.