राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा

By Admin | Updated: July 31, 2014 01:25 IST2014-07-31T01:03:52+5:302014-07-31T01:25:26+5:30

बुलडाणा विधानसभा निवडणुकांचे पडघम

NCP claims in two seats | राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा

राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा

बुलडाणा : विधानसभा निवडणुकांचे पडघम आता जोराने वाजु लागले असुन राज्यस्तरावर काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या जागा वाढवून मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली असुन त्यामध्ये बुलडाण्यातील बुलडाणा व जळगाव जामोद या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. काँग्रेस आघाडीमध्ये बुलडाण्यातील मेहकर व सिंदखेडराजा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून बुलडाणा, जळगाव जामोद,खामगाव,चिखली व मलकापूर हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. लोकसभेतील पराभवानंतर हे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी तयार झाले असुन इच्छूक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. बुलडाणा मतदारसंघात सतत पंधरा वर्षापासुन काँग्रेसचा पराभव होत असून तशीच स्थिती जळगावमध्येही आहे. जळगाव जामोद मध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसर्‍या क्रमांकावर होता त्यामुळे आता हे दोन्ही मतदारसंघ हे राष्ट्रवादीला मिळावेत असा प्रयत्न राष्ट्रवादीतुन सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तर तसा ठरावही घेतला आहे त्यामुळे जिल्हा पदाधिकार्‍यांनी हा मुद्दा थेट शरद पवार यांच्याकडे रेटून धरल्याची माहिती आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्येच उमेदवारीची मोठी स्पर्धा असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होणार आहे.


* खामगावात भाजपाचे स्पर्धक वाढले
खामगाव : भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची उमेदवारी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय ठाकरे पाटील, प्रल्हाद बगाडे, सारंगसिंह चव्हाण यांच्या पैकी एकाला देण्यात यावी यासठी या तिघांनीही आज एकत्र पत्रकार परिषद घेवून आपली दावेदारी स्पष्ट केली. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपमधील स्पर्धक वाढल्याचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी संजय ठाकरे, बगाडे आणि चव्हाण यांनी संयुक्तरित्या स्थानिक एका हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेला संबोधीत केले. आगामी विधानसभा निवडणुकीत खामगाव मतदार संघात लोकांना बदल हवा आहे. हा बदल केवळ आमच्या पैकी एकाची उमेदवारीच घडवू शकते असा दावाही तिघांनी पत्र परिषदेत केला. खामगाव मतदार संघात गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसचाच झेंडा फडकत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था देखील काँग्रेसच्याच ताब्यात आहे. आम्ही तिघे गेल्या २0 ते २५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. आमदार भाऊसाहेब फुंडकर यांची सलग तिसर्‍यांदा विधान परिषदेवर पक्षाने निवड केली आहे. आता कोणत्याही स्थितीत जनतेला महाराष्ट्रात व खामगाव विधानसभा मतदार संघात बदल हवा आहे. जनतेची मानसिकता ओळखून सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देण्यात यावा. आमच्या पैकी कुणालाही पक्षाने उमेदवारी द्यावी , आम्ही लोकशाही मार्गाने व पक्षाच्या चौकटीत राहून कार्यकर्त्यांचा असलेला हक्क व त्याची जाणीव होवून आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागत आहे असेही ते म्हणाले.

Web Title: NCP claims in two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.