‘एनसीडीईएक्स’कडे सोयाबीनचा दीड लाख टन साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:28 IST2019-02-22T14:28:00+5:302019-02-22T14:28:06+5:30
अकोला: सोयाबीनचे पीक आणि भाव चांगले असल्याने देशभरातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत नॅशनल कामोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे दीड लाख टन सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे.

‘एनसीडीईएक्स’कडे सोयाबीनचा दीड लाख टन साठा
अकोला: सोयाबीनचे पीक आणि भाव चांगले असल्याने देशभरातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली आहे. २० फेब्रुवारीपर्यंत नॅशनल कामोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे दीड लाख टन सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे. देशभरातील सोयाबीनच्या आवकमध्ये नेहमीप्रमाणे अकोला अव्वल असल्याची नोंद आहे.
यंदा देशभरात सोयाबीनचे पीक चांगले आले असून, भावही चांगला मिळत असल्याने बाजारपेठेत सोयाबीन मोठ्या प्रमाणात येत आहे. ३६०० ते ४००० पर्यंत प्रतिक्विंटल भाव सोयाबीनला मिळत असल्याने कास्तकारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे माल आणण्यास सुरुवात केली आहे. सोयाबीनची सर्वाधिक आवक अकोला परिसरात येत असून, अकोल्यातील ‘एनसीडीईएक्स’च्या गोदामात ४८ हजार टन सोयाबीनचा साठा गोळा झाला आहे. अकोलापाठोपाठ मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये २२ हजार टन, विशादा २० हजार टन, कोटा १९ हजार टन, मन्दसूर ११ हजार टन, शुजालपूर १४ हजार टन यांचा क्रमांक लागतो. नागपूर, लातूर आणि सागर, पीछाडीवर असून, येथील आकडा पाचशे टनच्या पलीकडेही गेलेला नाही. त्या तुलनेत अकोला परिसरातील सोयाबीनची आवक जास्त आहे. सोयाबीनचे दर चारच्या पलीकडे जाण्याचे संकेतही काही तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे जो माल अद्याप कास्तकारांच्या घरात आहे, तोदेखील बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.