जनावरांच्या मृत्यूस नैसर्गिक आपत्ती कारणीभूत

By Admin | Updated: August 18, 2014 22:40 IST2014-08-18T22:08:06+5:302014-08-18T22:40:20+5:30

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेकडो जनावरे दगावली होती.

Natural disaster causes death of animals | जनावरांच्या मृत्यूस नैसर्गिक आपत्ती कारणीभूत

जनावरांच्या मृत्यूस नैसर्गिक आपत्ती कारणीभूत

खामगाव : तालुक्यातील हिवरखेड येथे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेकडो जनावरे दगावली होती. ही जनावरे कुठल्याही साथरोगाने मृत्युमुखी पडली नसल्याचा अहवाल रोग अन्वेषण प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे हिवरखेड येथील जनावरांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळेच झाल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
तालुक्यातील हिवरखेड येथे अज्ञात आजाराने शेकडो जनावरे मृत्युमुखी पडत असल्याचे २0 जुलै रोजी उघडकीस आले. त्यानंतर २७ जुलैपर्यंत जनावरे दगावण्याचे सत्र तालुका आणि परिसरात सुरूच होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील १६५ जनावरांसह कोंटी, मांडणी, पोरज, गेरू, माक्ता आदी गावातील सुमारे ३00 जनावरे दगावली होती. यासह शेगाव तालुक्यातील जलंब, माटरगाव, मच्छिंद्रखेड, निंबी या ठिकाणी सुमारे ७0 जनावरे दगावली होती. या प्रकाराची वेळीच दखल घेत पशु संवर्धन विभागाने मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. सोबतच इतर जनावरांना प्रादुर्भाव होवू नये यासाठी फर्‍या आणि घटसर्प प्रतिबंधक लसीकरणही केले होते. दरम्यान, ही जनावरे साथीच्या रोगाने दगावल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात होता. पशु संवर्धन विभागाने त्यावेळी वातावरणातील बदलामुळे तसेच अशक्तपणामुळे ही जनावरे दगावल्याचा अंदाज व्यक्त करून मृत जनावरांचे शवविच्छेदन करून नमुने अकोला येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविले होते. अकोला येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेने या नमुन्यांची तपासणी करून खात्रीसाठी सदर नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठविले होते. विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेने मृत जनावरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल नुकताच खामगाव येथील पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालयाला सादर केला आहे. या अहवालात जनावरांचा मृत्यू साथरोगाने झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

** बुलडाणा येथील पशु वैद्यकीय पथकाने या प्रकाराची दखल घेतली होती. गावातील मृत जनावरांचे शवविच्छेदनासाठी नमुनेही बुलडाण्याच्या पथकाने गोळा केले होते. यामध्ये बुलडाणा येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एम.व्ही.कोलते यांच्यासह पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एस. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए.पी. गवळी, खामगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. एन.एच.बोहरा, डॉ. जी.एस.भोळे, डॉ. व्ही.आर. पटेल, डॉ. तिडके, एन. आर. मोरखडे, एन. एम. राऊत, एन. जी. करंकार, ग्रामसेवक ए.के. अंभोरे, गायकी, सरपंच मनोहर फुंडकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांनी मृत जनावरांचे सर्वेक्षण करून पंचनामे केले होते.

** लोकमतचा पाठपुरावा

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना सर्वप्रथम लोकमतने प्रकाशझोतात आणली. तालुक्यातील हिवरखेड येथील शंभरावर जनावरे मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वास्तव प्रकाशित केल्यानंतर तालुक्यातील इतर गावातील जनावरे मृत्युमुखी पडल्याची सविस्तर आकडेवारीही प्रकाशित केली होती. लोकमतच्या वृत्तानंतर महसूल प्रशासनाने विविध गावात भेट दिली होती हे येथे उल्लेखनिय!

** मदतीची प्रतीक्षाच

नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे मृत पावलेल्या पशुपालकांचे मोठे नुकसान झाले. याबाबतचा अहवाल महसूल प्रशासनाने जिल्हाधिकारी यांचेकडे सादरही केला आहे. मात्र महिना उलटूनही या नुकसानग्रस्त पशुपालकांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीत पशुपालन करणार्‍या या पशुपालकांना शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे.

** रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालात कोणत्याही साथ रोगाने जनावरांचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जनावरांचे वेळीच शवविच्छेदन करण्यात आले. खबरदारी म्हणून लसीकरणही पशुसंवर्धन विभागाने केले होते. यासंदर्भात सविस्तर अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

Web Title: Natural disaster causes death of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.